India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला विश्वचषक स्पर्धेत भारताकडून पराभव पत्करावा लागला तरी त्याचे कर्णधारपद गमावण्याची भीती वाटत नाही. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबर रोजी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी त्यांच्या ऐतिहासिक प्रतिस्पर्ध्यामध्ये एक नवीन अध्याय जोडण्यासाठी सज्ज आहेत. या मोठ्या सामन्याआधी, जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला विचारण्यात आले की, “या विश्वचषकात तुम्हाला तुमच्या कर्णधारपदाची चिंता आहे का, जर तुमचा संघ भारताविरुद्ध हरला तर काय होईल?” यावर बाबरने सूचक उत्तर दिले आहे. दोन्ही संघ आपले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. २८ वर्षीय बाबर आझमच्या उत्तरात खऱ्या अर्थाने आत्मविश्वास दिसून आला.
सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेदरम्यान, एका पत्रकाराने बाबरला भारताकडून हरल्यानंतर अनेक कर्णधारांनी कर्णधारपद गमावल्याची आठवण करून दिली, तेव्हा त्याने चोख प्रत्युत्तर दिले. बाबर म्हणाला, “माझं कर्णधारपद एका सामन्यातून जाणार नाही, मला जेवढे अल्लाहने लिहून ठेवलंय तितकंच मिळेन. त्यामुळे याचा फारसा विचार करत नाही.” बाबर आझम पुढे म्हणाला की, “इतिहासात मागे काय झाले, याचा आम्ही फारसा विचार करत नाही. सध्या आम्ही आजच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. विक्रम हे नेहमी तोडण्यासाठी असतात आणि आज तो आम्ही मोडण्याचा प्रयत्न करू.”
बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने २०२२ मध्ये टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मेन इन ग्रीन हा नुकताच आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर भारताकडून विस्थापित होण्यापूर्वी जगातील प्रथम क्रमांकाचा वन डे संघ बनला होता. या ऐतिहासिक सामन्याबाबत बरीच चर्चा आणि अपेक्षा आहेत. विशेषत: पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत भारताला कधीही पराभूत केलेले नाही, यावेळी हा इतिहास तसाच राहणार की बदलणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बाबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दबावाबाबत विचारले असता, तो म्हणाला की, “तरुणांना मार्गदर्शन करणे आणि गोष्टी सोप्या ठेवणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. प्रत्येक चेंडू कसा खेळायचा याचाच विचार करणे फार पुढचा किंवा मागे काय घडले हे संघातील खेळाडूंना विसरायला लावणे हे वरिष्ठ माझे काम आहे.” बाबर पुढे म्हणाला, “दबाव हाताळण्याचा मला अनुभव आहे. जेव्हा मी भारताविरुद्ध पहिल्यांदाच सामना खेळणार आहे तेव्हा माझ्यावर दबाव नक्कीच असणार. तरुणांना योग्य संदेश देणे हे ज्येष्ठ खेळाडूंचे काम आहे. जास्त विचार करण्याची गरज नाही, फक्त सामन्याचा विचार करा.”