गेल्या काही दिवसात भारतीय क्रिकेट संघात केदार जाधवने केलेली कामगिरी ही सर्व क्रीडारसिकांनी अनुभवली आहे. आक्रमक फलंदाज, यष्टीरक्षक आणि गोलंदाज अशा तिहेरी भूमिका बजावणाऱ्या या महाराष्ट्राच्या खेळाडूला भारतीय संघात उशीराने जागा मिळाली. मात्र ज्यावेळा संधी मिळाली, त्यावेळी केदार जाधवने त्याचं सोनं करुन दाखवलं आहे. संघ अडचणीत असताना केलेली आक्रमक फलंदाजी असो किंवा प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडण्यासाठी केलेली गोलंदाजी असो, प्रत्येक बाबतीत केदार जाधवने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये केदार जाधवने आपल्या गोलंदाजीत अशी काही सुधारणा केली आहे, की विराट कोहली त्याचा जमलेली जोडी फोडण्यासाठी नेहमी वापर करतो, आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारही १-२ विकेट आपल्या खात्यात जमा करतो.

मात्र आपल्या हमखास विकेट मिळवून देण्याबाबतच्या गोलंदाजीचं रहस्य विचारलं असता, केदार जाधवने ते आपल्यालाही उमगलं नसल्याचं कबूल केलं. BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत केदारने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कशी गप्पा मारल्या. ” मी अगदी मनापासून सांगतो, माझ्या गोलंदाजीवर विकेट कशा पडतात मलाही अजुन समजलं नाहीये. पण कर्णधार ज्या विश्वासाने माझ्याकडे चेंडु सोपवतो, तो विश्वास मी सार्थ ठरवतोय याचा मला आनंद आहे.” याचा माझी फलंदाजी सुधारण्यासाठीही फायदा झाल्याचं केदारने कबुल केलं.

सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतही केदारने आपलं महत्व अधोरेखीत केलं आहे. अखेरच्या सामन्यातही कर्णधार स्मिथला बाद करत केदारने ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडली होती. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये केदार जाधव कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader