सलामीवीर फलंदाज शिखर धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्येही आता चांगला जम बसवला आहे. परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणलेल्या नवीन नियमावलीमुळे धावा काढणे अधिक आव्हानात्मक झाले आहे, असे धवनचे मत आहे.
वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांना भारतीय संघातून वगळल्यानंतर धवन याच्यावर आक्रमक सलामी करण्याची जबाबदारी आली आहे. त्याने आपल्या कामगिरीने या जबाबदारीला न्यायही दिला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने नुकतीच ११६ धावांची खेळी केली होती. त्यामुळेच भारताला विजय मिळविता आला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत धवनने सांगितले की, ‘‘दोन्ही बाजूने नवीन चेंडूंचा उपयोग होत असल्यामुळे त्याचा फायदा स्वींग गोलंदाजांना होत असतो. पहिल्या दहा षटकांमध्ये सलामीच्या फलंदाजांना काळजीपूर्वक फलंदाजी करावी लागते. विशेषत: उसळून आलेल्या चेंडूंवर फटका मारणे सोपे नाही. अशा वेळी फटक्यांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते.’’
‘‘संघातील खेळाडूंमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. आम्ही येथे इंग्लंडमधील चॅम्पियन्स स्पर्धा व वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिका जिंकून आल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. संघातील सर्व खेळाडू युवा असल्यामुळे संघाला तंदुरुस्तीची समस्या जाणवलेली नाही,’’ असे धवन पुढे म्हणाला.