Suresh Raine, MS Dhoni: १५ ऑगस्ट २०२०चा दिवस कोणताही भारतीय क्रिकेट चाहता कधीही विसरू शकत नाही. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेट चाहत्यांना त्याच्या निर्णयातून सावरताही आले नाही की काही काळावेळातच त्याच्यासोबत बराच काळ खेळणारा फलंदाज सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली आणि सर्वांना आश्चर्यचकित करत मोठा धक्का दिला.
सुरेश रैना त्यावेळी ३३ वर्षांचा होता, जरी तो त्याआधी बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. पण धोनीसोबत तो त्यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही महत्त्वाचा भाग होता. रैनाने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर खेळलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खेळला होता. आता सुरेश रैनानेही धोनीनंतर काही वेळातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाचे कारण सांगितले. स्पोर्ट्स टाकशी बोलताना रैनाने सांगितले की, आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहे. या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला धोनीसोबत भारत आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकत्र खेळण्याची संधी मिळाली.
सुरेश रैनाने सर्वात मोठा खुलासा केला आहे
एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीचा खुलासा करताना रैनाने स्पोर्ट्स तकला सांगितले की, “आम्ही अनेक सामने एकत्र खेळलो. त्याच्यासोबत भारत आणि सीएसकेसाठी खेळण्याचे भाग्य मला लाभले. आम्हाला खूप प्रेम मिळाले. मी गाझियाबादहून आणि धोनी रांचीहून आला होता. मी एमएस धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी खेळलो. हे आमच्या दोघांमधील कनेक्शन आहे. आम्ही एकत्र अनेक फायनल खेळलो, २८ वर्षानंतर भारताला विश्वचषक जिंकवून दिला. तो एक महान नेता, कर्णधार आणि एक महान माणूसपण होता आणि कायम राहील.”
तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा पहिला खेळाडू
सुरेश रैनाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर नजर टाकली तर तो एक उत्तम फलंदाज होताच त्याचबरोबर एक उत्तम क्षेत्ररक्षकही होता. याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. रैनाने त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम २०२१ मध्ये खेळला होता. यानंतर त्याने २०२२च्या आयपीएल हंगामाच्या लिलावासाठी आपले नाव दिले. पण जेव्हा त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही, त्यानंतर रैनाने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली. रैनाच्या नावावर ५ एकदिवसीय शतकांशिवाय कसोटी आणि टी२० मध्ये १-१ शतकाची नोंद आहे.
अशी होती एमएस धोनीची कारकीर्द
जर आपण धोनीबद्दल बोललो तर त्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तीनही आयसीसी चषक जिंकले आहेत आणि असे करणारा तो एकमेव कर्णधार आहे. धोनीने २००४ साली बांगलादेशविरुद्ध २३ डिसेंबर रोजी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, सप्टेंबर २००७ मध्ये धोनीकडे पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याने २००७ टी२० विश्वचषक, विश्वचषक २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३चे विजेतेपद भारताला जिंकून दिले होते.