सईद अजमलची विनोदी टिपण्णी
पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर सईद अजमलने सचिन तेंडुलकरबाबत विनोदी टिपण्णी करून तमाम क्रिकेटरसिकांचा रोष ओढवून घेतला आहे. ‘विस्डेन इंडिया’ला दिलेल्या ताज्या मुलाखतीमध्ये अजमलने असे म्हटले आहे की, गेल्या वर्षी आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत मी सचिनला बाद करून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीसाठी प्रवृत्त केले.
२०१२मध्ये ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा सामना झाला होता. ४८ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारणाऱ्या सचिनला त्या सामन्यात अजमलनेच तंबूच वाट दाखवली होती तो सामना भारताने सहा विकेट आणि १३ चेंडू राखून जिंकला होता. परंतु सचिनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील तो अखेरचा सामना ठरला होता.
४६३ एकदिवसीय सामने खेळल्यानंतर मी बाद केल्यामुळेच त्याला एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करावा लागला, असे अजमलने विनोदाने म्हटले आहे. अजमल एवढय़ावरच थांबला नाही, तर सचिनविरुद्धच्या आपल्या यशाची गाथाही त्यानं ऐकवली. ‘‘२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील मोहालीमधील उपांत्य फेरीच्या सामन्यातसुद्धा मी सचिनचा ८५ धावांवर बळी घेतला होता. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ५० हजारांहून अधिक धावा जमा आहेत. त्यामुळेच सचिनचा बळी मिळवणे हा माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण ठरला,’’ असे अजमलने म्हटले आहे.