Ishan Kishan gut feeling about Hardik Pandya : अनेक महिन्यांच्या टीकेनंतर आणि ट्रोलिंगनंतर, भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला अखेर त्याचा गमावलेला आदर आणि सन्मान परत मिळाला आहे. गेल्या आठवड्यात भारताला बार्बाडोस येथे टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा पंड्या आयपीएल २०२४ दरम्यान चाहत्यांचे लक्ष्य होता. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्यावर चाहत्यांचा संताप अनावर झाला. त्याचा थेट परिणाम हार्दिक आणि मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर झाला. गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर राहिला. आता भारतीय संघाबाहेर असलेला यष्टिरक्षक इशान किशन याने हार्दिकच्या स्वभावाचे कौतुक केले आहे.
‘हार्दिकचे शब्द मी कधीच विसरणार नाही’ –
हार्दिकच्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केल्याबद्दल काही चाहते नाखूषही होते, परंतु हार्दिक हा अंतिम सामन्यात भारताला सामना जिंकून देणारा खेळाडू होता आणि संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी उल्लेखणीय राहिली. आता इशान किशनने इंडियन एक्स्प्रेसशी सांगितले, मला वाटते की हार्दिकने विश्वचषकासाठी हे सर्व राखून ठेवले होते. कारण त्याचे शब्द मी कधीच विसरणार नाही. तो मला म्हणाला होता, एकदा माझी कामगिरी चांगली होऊ दे. आज जे लोक शिव्या देत आहेत तेच लोक टाळ्या वाजवतील. ही गोष्ट त्याने मला तेव्हा सांगितली होती, जेव्हा तो सुद्धा खूप कठीण काळातून जात होता. तो म्हणाला होता, लोकांना आता बोलू दे, मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहीन.”
‘गेल्या सहा महिन्यांतील त्याचे आयुष्य शब्दात मांडणे कठीण’ –
इशान किशनला केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो आयपीएलपूर्वी बडोद्यात हार्दिकबरोबर सराव करताना दिसला होता. इशानने हे देखील उघड केले की भारताच्या उपकर्णधाराने त्याच्याबद्दल चाहत्यांच्या वागणुकीबद्दल कधीही तक्रार केली नाही. त्यांनी स्पष्ट केले की, “गेल्या सहा महिन्यांतील त्याचे आयुष्य शब्दात मांडणे कठीण आहे. कारण त्यांच्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या गेल्या, पण त्यांनी कधीही संयम गमावला नाही.”
हेही वाचा – IND vs ZIM : अभिषेक शर्माने गिलच्या बॅटने झळकावलं पहिलं शतक; म्हणाला, ‘मी अंडर-१२ संघापासून त्याच्या…’
इशान हार्दिकबद्दल बोलताना पुढे म्हणाला, “त्या काळात मी त्याच्याबरोबर जास्त होतो. मी त्याला कधी ओरडताना ऐकले नाही किंवा यार, माझ्यासोबत असे का होत आहे? मला आठवतंय, हार्दिक भाई एकदा आयपीएलच्या वेळी म्हणाला होता, जे हातात नाही त्याच्याबद्दल काय विचार करू. लोक बोलत आहेत, ते का बोलत आहेत, ते सर्वकाही नियंत्रित करू शकत नाहीत. लोक काय म्हणत आहेत याचा मी विचार करत राहिलो तर मी सर्व गमावून बसेन.’