मुंबई इंडियन्स संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आयपीएलच्या सहाव्या पर्वातील आपल्या उत्तम गोलंदाजीचे श्रेय भारतीय संघाचे माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांना दिले. अनिल कुंबळे मुंबई इंडियन्स संघाच्या फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक आहेत. आयपीएलच्या या मालिकेत हरभजनने एकूण २४ विकेट्स मिळवल्या आणि त्यानुसार या पर्वाच्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत हरभजन तिसऱ्या स्थानावर आहे.
एका टेलिव्हीजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हरभजन म्हणाला की, “आयपीएल ६ च्या मुंबई इंडियन्सच्या विजयामध्ये मी दिलेल्या योगदानाबद्दल मला गर्व आहे आणि याचे सारे श्रेय अनिल कुंबळे यांना जाते. संघाचा प्रशिक्षक म्हणून त्यांनी, माझ्या गोलंदाजीतील हरवलेली तीक्ष्णता परत आणण्यात  महत्वाची कामगिरी बजावली आहे.” तसेच “गोलंदाजीत उसळी चेंडू टाकणे ही माझी ताकद आहे असे त्यांनी मला सांगितले आणि त्यानुसार मी सामन्यांत गोलंदाजी केली. टी-२० सामन्यांमध्ये जास्त गतीने गोलंदाजी करण्यापेक्षा मी उसळी(फ्लाईट) गोलंदाजीवर जास्त भर दिला आणि विकेट्स प्राप्त करण्यात मी यशस्वी झालो.” असे हरभजने म्हटले.
“यावेळेस ‘पॉवर प्ले’मध्ये मी अनेक वेळा गोलंदाजी केली त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. टी-२० सामन्यांत गोलंदाजाला धावा रोखून चालत नाही, विकेट्सही घ्याव्या लागतात” असे सांगत हरभजनने आयपीएलच्या यापर्वातील त्याच्या गोलंदाजीचे अनुभव स्पष्ट केले. 

Story img Loader