Virat Kohli sent a heartfelt message to RCB’s new captain Rajat Patidar in IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ साठी रजत पाटीदारची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी चाहत्यांना वाटत होते की विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो, पण फ्रँचायझीने रजतला नवीन कर्णधार बनवून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याचवेळी, रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार झाल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. विराटने एक व्हिडिओ जारी करून रजतचे अभिनंदन केले आहे.

पाटीदारने सिद्ध केले आहे की तो नेतृत्व करू शकतो –

विराट कोहली म्हणाला की, मध्य प्रदेश संघाची जबाबदारी स्वीकारून पाटीदारने सिद्ध केले आहे की तो संघाचे नेतृत्व करू शकतो. त्याने आरसीबी चाहत्यांना आगामी हंगामात त्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले. रजत पाटीदार सुरुवातीपासूनच कर्णधार होण्याच्या शर्यतीत होता. पाटीदार हा त्या निवडक खेळाडूंपैकी एक आहेत ज्यांना फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी कायम ठेवले आहे. पाटीदारकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.

आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर कोहलीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली म्हणाला, “सर्वप्रथम मी पाटीदारचे अभिनंदन करू इच्छितो आणि सांगू इच्छितो की, ज्या पद्धतीने तू फ्रँचायझीमध्ये प्रगती केली आहेस आणि कामगिरी केली आहेस. त्यामुळे तू आरसीबी चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. सर्व तुला नेतृत्व करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर मी आणि संघातील प्रत्येक सदस्य तुमच्यासोबत उभा राहील आणि तुला पाठिंबा देऊ.”

पाटीदारला एक खेळाडू म्हणून उदयास येताना पाहिले –

कोहली पुढे म्हणाला, “ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी ही जबाबदारी अनेक वर्षांपासून पार पाडली आहे. गेल्या काही वर्षांत फाफ डु प्लेसिसने ही जबाबदारी पार पाडली होता. मला खात्री आहे की हा तुझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. मी पाटीदारला एक खेळाडू म्हणून उदयास येताना पाहिले आहे. त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत त्याचा खेळ अनेक पातळ्यांवर सुधारला आहे. त्याने ज्या पद्धतीने त्याच्या राज्य संघाचे नेतृत्व केले आहे, त्यावरून त्याने दाखवून दिले आहे की तो या फ्रँचायझीचे नेतृत्व करण्यास पात्र आहे.”

आयपीएल २०२५ साठी आरसीबीचा संपूर्ण संघ:

विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या, रजत पाटीदार (कर्णधार), यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड, सुयश शर्मा.

Story img Loader