फुटबॉल विश्वाला सध्या महाघोटाळ्याने ग्रासले आहे. निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्या जागी खेळाची जाण असलेल्या व्यक्तीने विराजमान व्हावे असा मतप्रवाह आहे. त्या दृष्टीने महान फुटबॉलपटू पेले यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. मात्र खुद्द पेले ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार नाहीत. ‘फिफाचा अध्यक्ष होण्याची माझी अजिबात इच्छा नाही’, अशा स्पष्ट शब्दांत पेले यांनी आपली भूमिका मांडली. ३८ वर्षांनंतर पेले कोलकाता भेटीवर आले आहेत. त्यादरम्यान पेले यांनी फिफा, आताचे खेळाडू, फुटबॉलपुढली आव्हाने या विषयांवर मत व्यक्त केले.
फुटबॉलची शिखर संघटना असलेल्या फिफाच्या पदाधिकाऱ्यांना घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अध्यक्ष ब्लाटर यांच्यावर तीन महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. फुटबॉलची प्रतिमा मलिन करणाऱ्या या संदर्भात अधिक भाष्य करण्यास पेले यांनी नकार दिला. पण मी अध्यक्ष होणार नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले.
ब्राझीलची जादू ओसरली
ब्राझीलमध्ये असलेले फुटबॉलचे वेड जराही कमी झालेले नाही. आजही देशात प्रतिभावान फुटबॉपटूंची कमतरता नाही. मात्र संघबांधणी करण्यात आम्ही कमी पडलो आहोत. खेळाडू वैयक्तिक चांगले असून भागत नाही तर एकत्रित संघ म्हणून त्यांची मोट बांधणे गरजेचे असते. खेळाडू क्लब्सशी बांधील असत, पण आता ते मध्यस्थांच्या हातातले खेळणे झाले आहे. ब्राझीलचा सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण हे निवडणे कठीण आहे. कारण ब्राझीलला मातब्बर फुटबॉलपटूंची परंपरा लाभली आहे. ब्राझीलला विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक मारिओ जोर्ग लोबो झागलो हे सर्वोत्तम प्रशिक्षक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातही असंख्य गुणी खेळाडू
भारतातही असंख्य गुणी खेळाडू आहेत. लहान वयात खेळाडू चटकन शिकतात. शाळा, महाविद्यालयांमध्ये फुटबॉलला स्थान मिळायला हवे. त्या पातळीवर स्पर्धाचे प्रमाण वाढायला हवे. गुणवान खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणाची संधी मिळावी. दळणवळणाची साधनांची उपलब्धता असल्याने खेळाडूंना परदेशात पाठवता येऊ शकते. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह ते खेळत नाहीत तोपर्यंत त्यांच्या खेळाला पैलू पडणार नाहीत.
गेल्या दशकातील मेस्सी सर्वोत्तम फुटबॉलपटू
वेगवेगळ्या कालखंडातल्या खेळाडूंची तुलना करणे कठीण आहे. पण गेल्या दहा वर्षांत लिओनेल मेस्सी सर्वोत्तम आहे. रोनाल्डोही सुरेख गोल करण्यात निष्णात आहे, पण मेस्सीची शैलीच वेगळी आहे. माझ्या सार्वकालीन संघात दोघांचाही समावेश असेल. ब्राझीलच्या नेयमारचे भविष्यही उज्ज्वल आहे. पेले यांची सातत्याने तुलना होणाऱ्या दिएगो मॅराडोनाचे नाव सार्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत घेतले नाही. मात्र त्यांनी इंग्लंडच्या बॉबी मूरचा आवर्जून उल्लेख केला.
नेहमी सच्चेपणाने खेळलो
कोणताही सामना असो, नेहमी सच्चेपणाने खेळलो. युवा खेळाडूंसाठी माझा हाच सल्ला आहे. प्रतिस्पध्र्याचा आणि तुमच्या चाहत्यांचा आदर ठेवा. तुम्ही कदाचित सर्वोत्तम खेळाडू असाल; परंतु मैदानावरचा प्रत्येक क्षण नवीन काही तरी शिकवतो. फुटबॉल हा वैश्विक परिवार आहे आणि या खेळामध्येच असे निरलस प्रेम अनुभवायला मिळते.
भारतीयांचे मनापासून आभार
आज इतक्या वर्षांनंतरही तुम्हा भारतीयांच्या प्रेमाने भारावून गेलो आहे. एक नवी पिढी मी अनुभवतो आहे. तुमच्यासारख्या दर्दी चाहत्यांचे प्रेम अनुभवायला मिळाले यासाठी मी देवाचे आणि तुमचे आभार मानतो.