काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सतत चर्चेत आहेत. अलीकडेच पाकिस्तानी रेंजर्सने इम्रान खान यांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्यांची सुटका झाली. अशात पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियांदाद यांनी इम्रान खान यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान बनण्यासाठी इम्रान खान यांना मी मदत केली. पण, याचा मला पश्चाताप होत आहे, अशी खदखद जावेद मियांदाद यांनी व्यक्त केली.
‘एआरवाय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावेद मियांदाद म्हणाले की, “इम्रान खान यांना पंतप्रधान होण्यासाठी मी मदत केली. शपथविधी सोहळ्यालाही मी उपस्थित होतो. पण, नंतर कधीही इम्रान खान यांचा आभार व्यक्त करण्यासाठी फोन आला नाही. याचा मला पश्चाताप आहे. ते इम्रान खान यांचे कर्तव्य होते.”
हेही वाचा : दुखापतग्रस्त असताना फलंदाजीला आलेल्या नॅथन लायनच्या धैर्याला सर्वांनी केला सलाम, पाहा VIDEO
“पाकिस्तान संघाचा पराभव झाल्यास कोणत्याही खेळाडूने इम्रान खान यांच्या शैलीवर आक्षेप घेतला नाही,” असेही मियांदाद यांनी सांगितलं.
हेही वाचा : सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचे पथक लवकरच भारतात; एकदिवसीय विश्वचषकाच्या केंद्रांची चाचपणी
इम्रान खान ऑगस्ट २०१८ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते. तीन वर्षाहून अधिक काळ इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून कर्तव्य बजावलं. पण, एप्रिल २०२२ मध्ये अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलं.