भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला असून आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा विश्वास आहे, की राहुल द्रविड आणि रोहित शर्माची जोडी भारतीय संघाला लवकरच विश्वचषक जिंकून देऊ शकते. राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ फक्त टी-२० विश्वचषकापर्यंत होता आणि त्यानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. त्याचबरोबर कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा आहे. टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे त्याने आधीच सांगितले होते.

हेही वाचा – Viral: कागदाच्या तुकड्याकडे पाहत असलेल्या धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर मिम्सचा पाऊस!

विराट कोहलीनंतर रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची जोडी कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळू शकते. या नव्या जोडीवर गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली असून संघासाठी आयसीसी विजेतेपद मिळवण्याची आशा व्यक्त केली आहे. स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ”मला आशा आहे, की रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही जोडी भारतीय क्रिकेटला या फॉरमॅटमध्ये पुढे घेऊन जातील आणि लवकरच आयसीसी स्पर्धा जिंकतील. ते इंग्लंडचा साचा पाळू शकतात.”

रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि त्यामुळेच त्याच्याकडून खूप आशा आहेत. त्याचबरोबर त्याने भारतीय संघाला आशिया कपचे विजेतेपदही मिळवून दिले आहे.

Story img Loader