आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर नावाचा हिरा देणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं आज वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. आचरेकर सरांच्या जाण्यानंतर क्रिकेट जगतातून मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या लाडक्या सरांच्या निधनामुळे भावुक झालेल्या सचिनने आपली प्रतिक्रीया दिलेली आहे.

“आचरेकर सरांनी आम्हाला मैदानात आणि मैदानाबाहेर नेहमी सरळ खेळ करायला शिकवलं. त्यांच्या आयुष्यात आम्हाला स्थान मिळालं आणि त्यांच्या हाताखाली मी शिकलो हे माझं भाग्य समजतो. आचरेकरांमुळे स्वर्गातलं क्रिकेट आता समृद्ध होईल. माझ्या आयुष्यातलं त्यांचं योगदान शब्दात सांगता येणार नाही. मला क्रिकेटची बाराखडी त्यांनीच शिकवली.  मी आज जिथे आहे त्याचं सगळं श्रेय आचरेकर सरांना आहे. काही दिवसांपूर्वी मी काही विद्यार्थ्यांसोबत त्यांना भेटलो होतो, त्यावेळी आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. त्यामुळे सर जिकडे जातील तिकडे प्रशिक्षण देत राहतील.” या शब्दांमध्ये सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, आचरेकर सरांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर क्रिकेट जगतातील आजी-माजी खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Story img Loader