एखादी आठवण आपल्या मनात अशी काही घर करुन जाते की आयुष्यभरासाठी आपल्याला तिचं महत्त्वं जरा जास्तच असतं. क्रिकेट विश्वात भारताच्या वाट्याला अशी आठवण तीन वेळा आली. भारताने दोन एकदिवसीय आणि १ टी २० विश्वचषक जिंकणं हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. पण अशा मोठ्या प्रसंगी जेव्हा काही गोष्टीची सल मनात राहते, तेव्हा त्याची कायम आठवण होत राहते. अशा एका गोष्टीबाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने ४-५ महिन्यांपूर्वी मौन सोडले होते.
२ एप्रिल २०११ ला भारतीय क्रिकेट संघाने ICC विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो थरार आजही कोणी विसरु शकलेलं नाही. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्याने अनेकांचीच स्वप्नपूर्ती केली. त्या सामन्यात गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि धोनीच्या नाबाद ९१ धावा यांच्या जीवावर भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. या सामन्यात गंभीरचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्या हुकलेल्या शतकाला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबाबदार आहे, असे गौतम गंभीरने नोव्हेंबर २०१९ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.
काय म्हणाला होता गंभीर
“विश्वचषक स्पर्धेत मी ९७ धावांवर बाद झालो. त्याबद्दल मला अनेकदा प्रश्न विचारले जातात. पण मी प्रत्येक वेळी सांगतो की मी त्यावेळी माझ्या वैयक्तिक धावसंख्येसाठी नव्हे, तर संघाला जिंकवून देण्यासाठी खेळत होतो. मला आजही लक्षात आहे की जेव्हा षटक संपलं तेव्हा मी आणि धोनी मैदानावर होतो. मी ९७ धावावंर असल्याची आठवण मला धोनीने करून दिली. धोनी मला म्हणाला की आता केवळ तुला ३ धावा करायच्या आहेत म्हणजे तुझे शतक होईल. त्याच्या या वाक्यामुळे मला माझ्या धावसंख्येबाबत आठवण झाली. तोपर्यंत मी केवळ प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या आव्हानाचाच विचार करत होतो. पण जेव्हा धोनीने मला माझ्या धावसंख्येची आठवण करून दिली, त्यावेळी मी खूपच बचावात्मक खेळू लागलो आणि त्यातच मी बाद झालो. जर मला धोनीने आठवण करून दिली नसती, तर मी कदाचित माझं शतक पूर्ण करू शकलो असतो”, असे गंभीर मुलाखतीत म्हणाला होता.
दरम्यान, अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनी सामनावीर ठरला होता, तर स्पर्धेचा मलिकावीर युवराज सिंग याला घोषित करण्यात आले होते.