ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर आता नेमबाज अपूर्वी चंडेला हिला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे वेध लागले आहेत. मात्र हे यश मिळवण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक आणि जास्तीत जास्त पुरस्कर्त्यांची गरज असल्याचे मत अपूर्वीने व्यक्त केले.
‘‘वडील कुलदीप सिंग चंडेला हेच माझा सर्वाधिक खर्च उचलतात. लाखो रुपये खर्च करून त्यांनी आमच्या घरातच माझ्यासाठी शूटिंग रेंज बांधली आहे. कारकिर्दीच्या महत्त्वाच्या क्षणी मला ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे सहकार्य लाभले. मात्र आधुनिक रायफल आणि अद्ययावत साधनसामुग्री विकत घेण्यासाठी मला पुरस्कर्त्यांची गरज भासत आहे. यशोशिखरावर पोहोचण्यासाठी मला तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घ्यावे लागणार आहे,’’ असे अपूर्वीने सांगितले.
अपूर्वीने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या भारताच्या अयोनिका पॉलला हरवत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. २१ वर्षीय अपूर्वीचे हे पहिले आंतरराष्ट्रीय पदक ठरले. ती म्हणाली, ‘‘आता ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे माझे ध्येय आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी पुरस्कर्त्यांचे पाठबळ हवे आहे. भारतीय नेमबाजी असोसिएशनच्या सराव शिबिरात असताना मला प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. पण घरी सराव करताना मला मानसिक कणखरतेसाठी सीडी किंवा डीव्हीडीवर अवलंबून राहावे लागते. मात्र अव्वल स्तरावर यश मिळवण्यासाठी मला वैयक्तिक प्रशिक्षणाची गरज आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर माझा आत्मविश्वास उंचावला असून आता यापुढेही असेच यश मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल.’’
ऑलिम्पिकमध्ये यश मिळवण्यासाठी पुरस्कर्त्यांची गरज -अपूर्वी चंडेला
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर आता नेमबाज अपूर्वी चंडेला हिला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे वेध लागले आहेत.
First published on: 08-08-2014 at 04:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I need more sponsors to achieve olympic success says apurvi chandela