Varun Chakravarthy: भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने नुकत्याच संपन्न झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो दुसऱ्या क्रमाकांचा गोलंदाज ठरला. तीन सामन्यात त्याने एकूण नवी बळी मिळवले. या कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या वरुणने त्याच्याबद्दलचा एक धक्कादायक अनुभव कथन केला आहे. आपल्या वाईट दिवसांची आठवण सांगताना तो म्हणाला की, २०२१ साली टी-२० विश्वचषकात खराब कामगिरी केल्यानंतर त्याला फोनवरून धमक्या मिळाल्या होत्या. भारतात परत येऊ नको, अशी धमकी त्याला मिळाली होती. तसेच त्याचा घरापर्यंत पाठलाग केला गेला, असेही त्याने सांगितले.

२०२१ साली झालेल्या टी२० विश्वचषकात वाईट कामगिरी केल्याबद्दल वरुण चक्रवर्तीला क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होईल की नाही? अशी चिंता त्याला सतावत होती. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट राइडर्स संघासाठी क्रिकेट खेळल्यानंतर २०२१ साली त्याला श्रीलंकेविरोधात टी२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तो आयसीसी विश्वचषकही खेळला. त्यावेळी त्याने भारतासाठी तीन सामने खेळले. पण त्याला एकाही सिनेमात विकेट मिळविता आली नाही.

वरुणने नुकतीचा एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने सांगितले की, तो माझ्यासाठी सर्वात वाईट काळ होता. मी नैराश्यात गेलो होतो. मला विश्वचषकात एकही विकेट मिळवता आली नाही, याबद्दल वाईट वाटत होते. त्यानंतर तीन वर्ष मला खेळण्याची संधी मिळाली नाही. यासाठीच पदार्पण करण्यापेक्षा संघात पुन्हा संधी मिळणे, हे माझ्यासाठी जास्त आव्हानात्मक होते.

वरुणने पुढे सांगितले की, विश्वचषकानंतर मला धमक्यांचे फोन यायला लागले. भारतात येऊ नको, अशी धमकी मला दिली गेली. लोक माझ्या घरापर्यंत पोहोचले होते. अशा लोकांकडून मी लपून राहत होतो. मी विमानतळावरून घरी परतत असताना काही दुचाकीस्वारांनी माझा पाठलाग केला होता. चाहत्यांना दुःख झाले, हे मी समजू शकतो. पण जेव्हा माझी आज प्रशंसा केली जाते, तेव्हा जुने दिवस आठवून मला हायसे वाटते.

२०२१ नंतर मी स्वतःला बदलले. त्याआधी मी एका प्रॅक्टिस सेशनमध्ये ५० चेंडू टाकत होतो. त्यानंतर मी दुप्पट चेंडू टाकण्यास सुरुवात केली. निवडकर्ते मला पुन्हा घेतील की नाही, याची काळजी न करता मी पुन्हा सरावावर लक्ष केंद्रीत केले. हे जरा अवघड होते, पण तीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मला वाटले सर्व काही संपले. पण आम्ही मागच्या वर्षी आयपीएल जिंकलो आणि मला पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी लाभली, असेही वरुण चक्रवर्तीने सांगितले.

Story img Loader