भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तब्बल तीन दशकानंतर आपल्या भुतकाळातील एका चुकीची कबुली देत पश्चाताप व्यक्त केला. १९८१ साली मेलबर्न कसोटीत पंचाच्या निर्णयाचा निषेध म्हणून सुनिल गावस्कर यांनी केलेल्या कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, माझी ती कृती म्हणजे मोठी चूक होती, अशी खेदजनक कबुली देत गावस्कर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली.
भारतीय संघ १९८१ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना एका कसोटी सामन्यात डेनिस लिली यांच्या गोलंदाजीवर सुनिल गावस्कर यांना पंचांकडून अयोग्य पद्धतीने बाद देण्यात आले होते. रेक्स व्हाईटहेड यांच्या कारकीर्दीतील पंच म्हणून तो तिसराच कसोटी सामना होता. त्यावेळी गोलंदाजाचा चेंडू गावस्कर यांच्या बॅटला स्पर्श करून पॅडला लागला होता. मात्र, पंचांनी गावस्कर यांना पायचीत म्हणून बाद दिले. पंचानी अयोग्य पद्धतीने बाद दिल्यामुळे निषेध म्हणून सुनिल गावस्कर बराच वेळ खेळपट्टीवर उभे राहिले. त्यानंतर पॅव्हेलियनकडे परतताना आपली बॅट पॅडवर जोरात आपटून त्यांनी आपला रागही व्यक्त केला होता. यावर डेनिस लिली यांनी गावस्कर यांना उद्देशून काहीतरी शेरेबाजी केली. तेव्हा सुनिल गावस्कर अचानकपणे पुन्हा खेळपट्टीवर परतले आणि दुसऱ्या बाजुला खेळत असलेल्या चेतन चौहानलाही आपल्याबरोबर पॅव्हेलियनकडे येण्यास सांगितले. गावस्कर यांच्या कृतीने गोंधळलेला चेतन चौहानही त्यांच्या मागे चालू लागला. मात्र, मैदानाच्या सीमारेषेजवळ भारतीय संघाचे व्यवस्थापक शाहीद दुरानी आणि बापू नाडकर्णी यांनी गावस्करांची समजूत घालून चेतन चौहानला पुन्हा खेळपट्टीवर पाठवले.
याबद्दल बोलताना गावस्कर यांनी भारतीय कर्णधार म्हणून माझी ती कृती मोठी चुक असल्याचे सांगितले. माझ्या त्या कृतीचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. बाद असो वा नसो, पण मी असे वागायला नको होते, असे सांगत सुनिल गावस्कर यांनी आपल्या पश्चातापाला मोकळी वाट करून दिली. आत्ताच्या काळात माझ्याकडून असे काही घडले असते, तर मला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले असते, असेही त्यांनी म्हटले.

Story img Loader