भारतीय संघात खेळाडूंची निवड करताना कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने अवलंबलेल्या रोटेशन पॉलिसीला, भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने पाठींबा दिलाय. घरच्या मैदानात संघातील महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन नवोदीतांना संधी देण्याचा मार्ग भारतीय संघ व्यवस्थापनाने स्वीकारला आहे. कोहलीचा हा निर्णय अत्यंत योग्य असून, यामुळे खेळाडूंना विश्रांती मिळत असल्याचं शमीने नमूद केलं.
अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे रणजी सामना खेळणार, ओडीशाविरुद्ध सामन्यासाठी मुंबईच्या संघात निवड
विराट कोहलीच्या याच निर्णयामुळे मला कसोटीसह अन्य क्रिकेट प्रकारांसाठी तयार होण्यासाठी वेळ मिळाला. मधल्या काळात घरच्यांसोबत राहून मी विश्रांतीही घेतल्याचं सांगत, शमीने कोहलीच्या निर्णयाला पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या आपल्या फिरकीपटूंना विश्रांती देत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या नवोदीत फिरकीपटूंना संघात जागा दिली. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका आटोपल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात आता जाडेजा आणि आश्विनची निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शमीला भारतीय संघात जागा मिळाली होती. मात्र बंगळुरु वन-डेचा अपवाद वगळता त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र बंगळुरुच्या वन-डे सामन्यातही आपल्या १० षटकांचा कोटा पूर्ण केल्यानंतर शमीला एकही विकेट मिळवता आली नव्हती. यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहवर आपला विश्वास दाखवण्याचं ठरवलं.