Riyan Parag Big Goal in Life : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका ६ जुलैपासून सुरू होत आहे. आसामचा फलंदाज रियाग पराग यालाही झिम्बाब्वेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्याची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे. परागने आयपीएल २०२४ मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी १५ सामन्यांमध्ये ५२.०९ च्या सरासरीने ५७३ धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. आता परागचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने आपल्या आयुष्यातील एक मोठे उद्दिष्ट सांगितले आहे.
‘मला लोकांसाठी ते बदलायचे आहे’ –
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना रियान पराग म्हणाला, “मला मोठे होताना नेहमी वाटायचे की आपल्या भागातील लोक मोठे स्वप्न पाहण्यापासून थांबवतात. मला आता ते बदलायचे आहे. मी अद्याप (आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या) पातळीपर्यंत पोहोचलो नाही. मला देशासाठी खेळायचे आहे. एकदा मी देशासाठी खेळायला लागल्यावर लोकांना कळेल की त्यांच्याकडे एक मार्ग आहे. मी आयपीएलमध्ये खेळलो आहे आणि लोकांना हे समजले आहे की तुम्ही आसामसारख्या लहान राज्यातून असलात तरीही त्या पातळीपर्यंत पोहोचू शकता.”
‘आयपीएल इतके मोठे लक्ष्य नाही’ –
तो पुढे म्हणाला, “परंतु आयपीएल इतके मोठे लक्ष्य असू शकत नाही. तुम्ही एक वर्ष खेळू शकता आणि नंतर गायब होऊ शकता. पण जेव्हा मी देशासाठी खेळेल, मला वाटते की खरा रोडमॅप तेव्हाच निश्चित होईल. त्यांना प्रत्यक्षात त्याचे पालन करण्याची गरज नाही. ते यासाठी स्वतःचा मार्ग तयार करू शकतात.” परागला त्याच्या कामगिरीसाठी आणि आयपीएल २०२४ च्या आधीच्या हंगामात मैदानाबाहेरील काही टिप्पण्यांमुळे खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा – “आधी देशभक्त हो…”, रियान परागच्या वादग्रस्त वक्तव्यावर श्रीसंत संतापला; पण नेमकं काय घडलं?
‘लोक स्विचप्रमाणे बदलतात’ –
पराग म्हणाला, “हे सोपे नाही. गेल्या वर्षभरानंतर मी स्वतःशी बोललो. या प्रकारचे पुनरागमन वैयक्तिक आहे. कारण मला अशा गोष्टी सहन कराव्या लागल्या, ज्याच्यासाठी मी खरोखरच पात्र नव्हतो. कदाचित माझ्या तयारीत काही गोष्टींची कमतरता असेल, पण तरीही मला असे वाटते की मला इतक्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागायला नको होता. पण मी काय करू शकतो? लोक पर्वा न करता काही ना काही बोलत राहतील. गेल्या वर्षी तो म्हणाला की मी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पुरेसा चांगला नाही. असेल लोकाना वाटत होते. आता त्यांना मी भारतीय संघात हवा आहे. त्यामुळे लोक अगदी स्विचप्रमाणे बदलतात.”