स्थानिक क्रिकेट पाहण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याच्या कारणास्तव राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता मुंबईच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी पुनरागमन झाल्यावर मुंबई क्रिकेटला योगदान द्यायचे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
‘‘निवड समितीमध्ये मी पुनरागमन करावे म्हणून एमसीए प्रयत्नशील होती. गेल्या वर्षी स्थानिक क्रिकेटला वेळ देऊ शकत नसल्याने मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण यावर्षी मी काही स्थानिक सामने पाहिले आणि मुंबईच्या स्थानिक क्रिकेटमधून गुणवत्ता हेरण्याचे मी ठरवले. त्यामुळेच पुन्हा एकदा मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे ठरवले,’’ असे पाटील यांनी सांगितले.
वरिष्ठ संघाबरोबरच पाटील यांना २५ वर्षांखालील गटाच्या निवड समितीचे अध्यक्षपद दिले आहे. या समितीमध्ये त्यांच्याबरोबर मिलिंद रेगे, संजय शेट्टी आणि निशित शेट्टी यांचा समावेश आहे.
‘‘मुंबई क्रिकेटचा मी ऋणी आहे आणि त्यासाठी मुंबईला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देईन, अशी आशा आहे. मी हे एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे,’’ असे पाटील म्हणाले.
मुंबईला यंदा रणजी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राकडून पराभूत व्हावे लागले होते. त्याचबरोबर विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेबरोबर पश्चिम विभागीय स्पर्धेमध्येही मुंबईची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही.
मुंबई क्रिकेटला योगदान द्यायचे आहे -पाटील
स्थानिक क्रिकेट पाहण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याच्या कारणास्तव राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी मुंबई
First published on: 09-04-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I want to contribute again to mumbai cricket patil