भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांच्याकडून तल्लख बुद्धिमत्ता मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यांचा फायदा घेत सामना जिंकून देणारा खेळाडू होण्यासाठी मी उत्सुक आहे, असे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने सांगितले.

वूडला आगामी इंडियन प्रीमिअर लीगसाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. याबाबत तो म्हणाला, ‘‘धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा मला खूप अभिमान वाटत आहे. माझ्या दृष्टीने चेन्नई हा या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे. अशा संघाकडून खेळताना मी सर्वोत्तम कौशल्य दाखवण्यावर भर देईन.’’

वूड हा ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्याबाबत ख्यातनाम मानला जातो. याविषयी तो म्हणाला, ‘‘वेगाने चेंडू टाकताना टप्पा व दिशा यावर नियंत्रण ठेवणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आयपीएलमध्ये त्यादृष्टीने माझ्यावर थोडेसे दडपण असेल, तरीही सरावानंतर मी उत्तम लय ठेवीत यशस्वी होईन.’’

‘‘आम्ही ताशी १४० किलोमीटर वेगाने सातत्यपूर्ण गोलंदाजाच्या शोधात होतो. संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी वूडचे सामने पाहिले असल्यामुळे त्यांनी वूडला संघात स्थान देण्याची शिफारस केली व ती आम्ही मान्य केली. वूडकडे उत्तम नैपुण्य आहे व या स्पर्धेत आम्हास विजेतेपद मिळवण्यासाठी साथ देईल अशी मला खात्री आहे,’’ असे चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. विश्वनाथन यांनी सांगितले.

 

Story img Loader