दिग्गज फुटबॉलपटू पेले आणि बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांच्याप्रमाणे कारकिर्दीत यशोशिखरावर असताना टेनिसला अलविदा करायचे आहे, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने व्यक्त केले. रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मला ही संधी देऊ शकते असे त्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘ऑलिम्पिकमध्ये पदकासह निवृत्त होणे पेले आणि अली यांच्याप्रमाणे निवृत्त होण्याची संधी देईल. माझ्या कारकिर्दीत मी अली, पेले, मायकेल जॉर्डन, कार्ल लुइस, रॉड लेव्हर यांना आदर्श म्हणून पाहिले. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच या दिग्गजांनी आपापल्या खेळाला अलविदा केला. तोच वारसा जपण्याचा माझा प्रयत्न असेल.’’
४१व्या वर्षीही जबरदस्त ऊर्जेने खेळणाऱ्या पेसने सर्बियाविरुद्धच्या डेव्हिस चषकाच्या लढतीत रोहन बोपण्णाच्या साथीने खेळताना थरारक विजय मिळवला होता. या विजयामुळेच भारतीय संघाने सामन्यातले आव्हान जिवंत ठेवले.
‘‘ताकद आणि लवचिकता यांचा मिलाफ साधणे कठीण आहे. माझा खेळ सर्वागीण आहे. जलद हालचाली माझ्या खेळाचा अविभाज्य घटक आहे. टेनिससाठी आवश्यक स्नायू तंदुरुस्त राखण्यासाठी मी मेहनत करतो. वैयक्तिक कारणांमुळे माझ्या टेनिसवर परिणाम झाला आहे, मात्र जागतिक स्तरावर टिकण्यासाठी खेळात काय बदल करायचा हे मला माहिती आहे’’, असे त्याने सांगितले.
आपल्या मुलीला मार्गदर्शन करण्याविषयी पेस म्हणाला की, ‘‘प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कठीण कालखंडाला सामोरी जाते. बाप-लेकीचे नाते अनोखे असते. वाढत्या वयानुसार तिला मार्गदर्शनासाठी माझी आवश्यकता आहे. तिला मानसिक आधार देणे हे माझे कर्तव्य आहे. टेनिसच्या आवडीसाठी पित्याच्या कर्तव्यात कसूर होणार नाही.’’
डेव्हिस चषकात सोमदेवच्या कामगिरीविषयी समाधानी असल्याचे पेसने सांगितले. त्याची तंदुरुस्ती युवा खेळांडूसाठी प्रेरणा आहे.

Story img Loader