तब्बल दोन वर्ष मुंबईकर अजिंक्य रहाणेला भारताच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात स्थान मिळालेलं नाहीये. अजिंक्य सध्याच्या घडीला फक्त कसोटी संघात भारताचं प्रतिनिधीत्व करतो. २०१८ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणे आपला अखेरचा वन-डे सामना खेळला होता. मात्र यानंतर अजिंक्यला वन-डे संघात स्थान मिळालं नाही. भारतीय संघाचे माजी खेळाडू चेतन चौहन यांनी, अजिंक्यला आता वन-डे संघात जागा मिळायला हवी असं वक्तव्य केलं आहे.

“ज्यावेळी रोहित शर्मा आणि शिखर धवन दुखापतग्रस्त होते, त्यावेळी अजिंक्यला वन-डे संघात जागा मिळेल असं मला वाटलं होतं. महत्वाच्या प्रसंगात संघाला स्थैर्य देणारा एक फलंदाज तुम्हाला हवाच असतो. जसप्रीत बुमराह सध्या थकलेला दिसतो, पण कसोटी मालिकेत तो पुनरागमन करेल अशी आशा आहे. अजिंक्य आणि इतर अनुभवी खेळाडू कसोटी मालिकेत पुनरागमन करतील, त्यामुळे कसोटी मालिका रंगतदार होईल अशी आशा आहे”, चौहान पत्रकारांशी बोलत होते.

याआधी अजिंक्य रहाणेनेही आपण वन-डे संघात पुनरागमनाची आशा सोडली नसल्याचं सांगितलं होतं. किंबहुना न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होताना अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचारही होत होता….मात्र त्याच्या नावावर सहमती न झाल्यामुळे अजिंक्यचं नाव मागे पडलं. न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ मार्च महिन्यात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Story img Loader