IND vs ENG Tilak Varma target to Jofra Archer Chepauk T20I : भारताने चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर तिलक वर्माच्या वादळी खेळीच्या बळावर इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला. या सामन्यात तिलकने इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरला चांगलाच घाम फोडला. सामन्यानंतर तिलक वर्मा म्हणाला, दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला लक्ष्य करणे त्याच्या रणनीतीचा एक भाग होता. इंग्लंडच्या सर्वोत्तम गोलंदाजाला निष्प्रभ करणे हा त्याचा उद्देश होता, ज्यामुळे उर्वरित गोलंदाजाच्या मनात दहशत निर्माण होईल.
तिलक वर्माने ५५ चेंडूत नाबाद ७२ धावा करत भारताला दोन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला. अशाप्रकारे भारत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. तिलकने आर्चरविरुद्ध चार षटकार मारले, ज्यात डीप फाइन लेगवर अतिशय दमदार पिक-अप फ्लिकचा समावेश होता. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात चार षटकांत २१ धावांत दोन विकेट्स घेणाऱ्या ऑर्चरने चेपॉकमध्ये चार षटकांत ६० धावा दिल्या.
तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केले लक्ष्य –
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत तिलक म्हणाला, “मला त्यांच्या सर्वोत्तम गोलंदाजाला लक्ष्य करायचे होते. सर्वोत्तम गोलंदाजाला लक्ष्य केल्यास इतर गोलंदाज दडपणाखाली येतात त्यामुळे, जेव्हा विकेट पडतात (दुसऱ्या टोकाला), तेव्हा मला विरोधी पक्षाच्या सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध आक्रमक फलंदाजी करायला आवडते. कारण जर मी हे करण्यात यशस्वी झालो तर इतर फलंदाजांसाठी काम सोपे होते. मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्यांच्याविरुद्ध संधी निर्माण केल्या. आर्चरविरुद्ध खेळलेल्या सर्व शॉट्ससाठी मी नेटमध्ये तयारी केली होती. मी मानसिकदृष्ट्या तयार होतो आणि त्यामुळेच मला यश मिळाले.”
काहीही झाले तरी शेवटपर्यंत टिकायचय –
शेवटपर्यंत टिकून राहण्याची मानसिक तयारी असून संघाच्या गरजेनुसार खेळात बदल करण्याची तयारी असल्याचे तिलक वर्माने सांगितले. तो पुढे म्हणाला, “मी ठरवले होते की काहीही झाले तरी मला शेवटपर्यंत टिकायचे आहे. गेल्या सामन्यादरम्यान गौतम सरांशी माझे बोलणे झाले होते. संघाच्या गरजेनुसार मी ठराविक स्ट्राइक-रेटने खेळू शकतो. तुम्हाला परिस्थितीनुसार खेळावे लागते. आज गौतम सरांनी येथे ड्रिंक्स ब्रेक दरम्यान असेही सांगितले होते की हीच संधी आहे जेव्हा तुम्ही लोकांना दाखवू शकता की तुम्ही सर्व प्रकारचे डाव खेळण्यास सक्षम आहात. असे करण्यात मी यशस्वी झालो याचा मला आनंद आहे.”