Neeraj Chopra on World Cup final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने सहज विजयाची नोंद केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राही विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आला होता. विश्वचषकानंतर अंतिम सामन्यावेळी त्याला टीव्हीवर दाखवले गेले नसल्याची बरीच चर्चा झाली होती. आता खुद्द नीरजनेच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, नीरजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, त्यानंतर चाहते ब्रॉडकास्टरवर संतापले. त्याचवेळी आता नीरजने याबाबत आपलं मत मांडलं आहे. याबाबत नीरज चोप्रा बोलला आणि जे काही सांगितले आहे, त्यामुळे त्याने चाहत्यांची मने जिंकली. नीरज म्हणाला, “मी जेव्हा स्पर्धा करतो तेव्हा त्यांनी मला दाखवावे असे मला वाटते. जेव्हा मी डायमंड लीगमध्ये भाग घेतो आणि माझी स्पर्धा सुरू असते, ती नीट प्रसारित होत नाही, तेव्हा मला त्याचे वाईट वाटू शकते. ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी , ब्रॉडकास्टर फक्त हायलाइट्स दाखवतात. मी अहमदाबादला फक्त सामना पाहण्यासाठी गेलो होतो आणि मला खूप मजा आली.”

याआधी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत नीरज चोप्रा म्हणाला होता, “जेव्हा मी डायमंड लीगमध्ये भाग घेतला तेव्हा त्यांनी माझ्या सामन्याचे थेट प्रेक्षेपण केले नाही, तरीही मी काहीही बोललो नाही. आता यावेळी तर मी अहमदाबादला टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी गेलो होतो. मी या सामन्याचा खूप आनंद घेतला. भारताने हा अंतिम सामना जर जिंकला असता तर मला अधिक आवडले असते. मी कधीही कॅमेऱ्यात का दाखवले नाही यावर बोललो नाही. हा माझा पहिला क्रिकेट सामना होता जो मी पूर्ण पाहिला. मला जे हवे होते त्याबद्दल कोणीही बोलत नाही. टीम इंडियाने हा विश्वचषक जिंकावा हे मला हवे होते ते झाले नाही. बाकी कॅमेऱ्यात दिसला काय नाही दिसला, याने मला काहीच फरक पडत नाही.”

नीरज पुढे म्हणाला, “जेव्हा मी फ्लाइटमध्ये होतो, तेव्हा भारताने तीन विकेट्स अगोदरच गमावल्या होत्या. आम्ही जेव्हा स्टेडियमवर पोहोचलो तेव्हा विराट कोहली आणि के.एल. राहुल फलंदाजी करत होते. माझ्या मते दिवसा फलंदाजी करणे तितके सोपे नव्हते. संध्याकाळी दव पडल्याने ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करणे सोपे झाले. आमच्या खेळाडूंनी खूप मेहनत घेतली. अंतिम दिवस त्याच्यासाठी नव्हता. ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा मला वाटले की, त्यांची मानसिकता ही टीम इंडियावर दबाव टाकण्याची होती आणि तसेच त्यांनी केले. मात्र, पुढच्या वेळी टीम इंडिया नक्की विश्वचषक जिंकेल.”

हेही वाचा: जय शाहा ‘स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित; BCCIने केले ट्वीट, “त्यांचे नेतृत्त्व हे…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दीपिका पदुकोण, शाहरुख खान, सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांसारखे अतिथी अंतिम सामन्यात पोहोचले होते. हे सर्व अनेक वेळा टीव्हीवर दिसत होते. पण नीरज चोप्रा एकदाही टीव्हीवर दिसला नाही. सोशल मीडियावर चाहत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I wanted to win india neeraj chopra reacted when the world cup final was not shown on tv avw