ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सामन्यादरम्यान पायाला झालेल्या दुखापतीमुळे युवा मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉला संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं होतं. मात्र आगामी आयपीएल हंगामाआधी मी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमनाचा प्रयत्न करेन असा विश्वास पृथ्वी शॉने व्यक्त केला आहे. तो India TV वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“आयपीएलआधी मी पूर्णपणे तंदुरुस्त होईन, त्यासाठी माझे प्रयत्न सुरुच आहेत.” पृथ्वीने आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली. ऑस्ट्रेलियात सराव सामन्यादरम्यान रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर झेल पकडताना पृथ्वी शॉचा डावा पाय भयानक पद्धतीने दुमडला गेला आणि त्याच्या शरिराचं सर्व वजन हे एका पायावर आल्यामुळे तो खाली कोसळला. यानंतर पृथ्वीची दुखापत बरी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तसं झालं नाही.

पर्थ कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात मी पुनरागमन करण्याच्या तयारीत होतो. फिजीओथेरपिस्ट माझ्यावर मेहनत घेत होते. मात्र प्रत्येकवेळी मी प्रयत्न करत असताना, मला वेदना होत होत्या. मात्र दुखापत ही आपल्या हातात नसते. ऑस्ट्रेलियात खेळण्याचं माझं स्वप्न होतं, मात्र दुखापतीमुळे ते साध्य झालं नाही. यादरम्यान सर्व सहकाऱ्यांनी आपल्याला प्रचंड मदत केल्याचंही पृथ्वीने म्हटलं. 2018 साली विंडीजच्या भारत दौऱ्यात कसोटी मालिकेमधून पृथ्वीने भारतीय संघात पदार्पण केलं होतं.

Story img Loader