आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव पार पडल्यानंतर आता कर्णधारपदासाठी कोण बाजी मारणार याची चर्चा सुरु झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणारा गौतम गंभीर यंदाच्या हंगामापासून पुन्हा एकदा दिल्लीकडून खेळणार आहे. या हंगामात गौतम दिल्लीचं नेतृत्व करताना दिसेलं, त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व कोणाच्या हाती जाणार हा चर्चेचा विषय होता. या शर्यतीत आता कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पाने उडी घेतली आहे.
Sportslive या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रॉबिन उथप्पाने नवीन हंगामात कोलकात्याचं नेतृत्व करण्यास उत्सुकता दाखवली आहे.”कर्णधारपदाची संधी आल्यास माझ्यासाठी तो एक बहुमानच असेल. मात्र हा निर्णय मी घेणार नसून संघ व्यवस्थापन जी काही भूमिका देईल त्यावर मी खेळण्यास तयार आहे. मी माझ्याकडून मैदानात जीव तोडून मेहनत घेईन.” कर्णधारपदासाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना रॉबिन उथप्पाने आपली बाजू मांडली.
अवश्य वाचा – चेन्नई सुपरकिंग्जने डावलल्यामुळे रविचंद्रन आश्विन नाराज
२०११ पासून गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतो आहे. अकराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने राईट टू मॅच कार्डाद्वारे ६ कोटी ४० लाखांची बोली लावत उथप्पाला आपल्या संघात दाखल करुन घेतलं होतं. सुरुवातीचे काही वर्ष मी कोणत्याही एका संघामध्ये स्थिर नव्हतो. मात्र गेली काही वर्ष कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना इथल्या लोकांशी माझं एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे. प्रत्येक सामन्यात इथल्या चाहत्यांनी आणि संघ व्यवस्थापनाने मला गरज असताना पाठींबा दिला असल्याचंही उथप्पा म्हणाला. त्यामुळे ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कोलकात्याचं नेतृत्व करतो हे पहावं लागणार आहे.