‘‘मी तारांकित खेळाडू नाही. मी त्या दृष्टीने विचारही करत नाही. माझ्या खेळात देशवासीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी करणे हे माझे काम आहे. क्रीडाविश्वातील प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणे हे माझे उद्दिष्ट आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीचे सोने करत इतिहास घडवण्यासाठी अथक परिश्रम करेन,’’ असा विश्वास जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरने व्यक्त केला. रिओ येथे सुरू असलेल्या स्पर्धेद्वारे दीपा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय जिम्नॅस्टिकपटू ठरली होती. याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर मायदेशी परतलेल्या दीपाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘‘जिम्नॅस्टिक्स खेळायला सुरुवात केल्यापासून ऑलिम्पिक हे मला खुणावते आहे. या स्पर्धेत पदक पटकावणे खडतर आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे मला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरायचे होते. मात्र पाचवे स्थान मिळाल्याने ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न लांबणीवर पडले. त्यामुळे रिओ येथे झालेल्या चाचणी स्पर्धेद्वारे कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिकसाठी पात्र होणे हे माझे ध्येय होते. हे ध्येय साध्य झाल्याने प्रचंड आनंद आणि समाधानाची भावना आहे,’’ असे दीपाने सांगितले. ५२.६९८ गुणांसह दीपा कलात्मक जिम्नॅस्टिक्स प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. ५२ वर्षांनंतर भारतीय जिम्नॅस्टिकपटू ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर सादरीकरण करणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकूण ११ जिम्नॅस्टिकपटूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे पुरवण्यात आलेल्या पायाभूत सुविधांविषयी विचारले असता दीपा म्हणाली, ‘‘पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. सादरीकरण करताना जिम्नॅस्टिकपटूंना दुखापत होऊ नये, यासाठी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये फोम फिट पुरवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत नवीन स्प्रिंगबोर्ड उपलब्ध होईल, असे आश्वासन ‘साइ’ने दिले आहे. सरावावर लक्ष केंद्रित करणे माझे काम आहे. त्यासाठी मला विविध स्तरांतून मदतीची आवश्यकता आहे.’’
‘‘बिश्वेवर नंदी यांच्यासारखा मार्गदर्शक मिळणार नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आतापर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. त्यांच्यामुळेच लोकांना माझे नाव आणि खेळ समजला आहे. त्यामुळे माझ्या यशाचे श्रेय त्यांना आहे,’’ असे दीपाने सांगितले.
सगळ्यात कठीण अशा प्राडुनोव्हा प्रकारातील सादरीकरणाबद्दल विचारले असता दीपा म्हणाली, ‘‘यश मिळवण्यासाठी धोका पत्करावा लागतो. प्राडुनोव्हासाठी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली. प्राडुनोव्हाचे कौशल्य तिथेच शिकले आणि तिथेच सराव करते.’’
‘‘ऑलिम्पिकमधील दीपाच्या कामगिरीविषयी मी कोणतेही भाकीत करणार नाही. अन्य खेळांपेक्षा जिम्नॅस्टिक्स वेगळ्या स्वरूपाचा खेळ आहे. दीपाला सरावासाठी विदेशी जाण्याची आवश्यकता नाही. इंदिरा गांधी स्टेडियम आणि साइ यांनी सर्व सोयीसुविधा पुरवण्याची हमी दिली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सरावाला सुरुवात करू,’’ असे बिश्वेवर नंदी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा