आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आजीवन बंदी घातली तरी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतचे मी काहीही चुकीचे कृत्य केले नसल्याचे तुणतुणे कायम आहे. क्रिकेटला धोका पोहोचेल, असे कोणतेही वाईट कृत्य मी केलेले नाही. मी निर्दोष आहे, असे श्रीशांतने शनिवारी सांगितले.
शिस्तपालन समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयने जाहीर केलेल्या निर्णयावर श्रीशांतने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘बीसीसीआयची कारवाई हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का आहे. त्यामुळे मी नाराज झालो आहे. खडतर परिस्थितीतून मी बाहेर येईन आणि आयुष्यात यशस्वी पुनरामगन करेन. मला या प्रकरणात का गोवण्यात आले आहे, हेच मला समजत नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही, हे मी ओरडून ओरडून जगाला सांगत आहे.’’
‘‘बीसीसीआयने माझ्याबाबतीत इतका कठोर निर्णय का घेतला, हेच मला समजत नाही. मी सध्या तुरुंगात नाही, तर घरी आहे, हीच काय ती दिलासा देणारी बाब आहे. मी गेली नऊ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. पण मला कधीही कुणीही सहकार्य केलेले नाही. जर मला कुणाचा पाठिंबा मिळाला असता तर आज ही परिस्थिती माझ्यावर ओढवलीच नसती,’’ असेही त्याने सांगितले.

Story img Loader