इंग्लंडमधील क्रिकेट स्टेडियम गतिमान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरतात यावर मी उत्सुक नसून गोलंदाजीसाठी भरपूर मेहनत करणार असल्याचे भारतीय संघाचा युवा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक सामन्यांसाठी भारतीय संघ आज बुधवार रवाना झाला.
भुवनेश्वर म्हणाला की, “हा माझा पहिला इंग्लंड दौरा आहे आणि तेथील परिस्थिती गोलंदाजांसाठी पोषक असल्याचे मी एकले आहे. परंतु, यावर मी उत्सुक नाही कारण, फक्त चांगल्या मैदानाच्या जोरावर विकेट्स मिळत नसतात तेथे मी भरपूर सराव करीन.”
भारताचा कॅप्टन कुल धोनीने इंग्लंडच्या मैदानांवर गोलंदाजांना मिळणाऱ्या स्विंगमुळे भारताचे गतिमान गोलंदाज उत्तम प्रदर्शन करतील असे म्हटले आहे. भारतीय संघाच्या गतिमान गोलंदाजीची मदार भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव, विनय कुमार आणि इरफान पठाण यांच्यावर आहे. तर, आर.अश्विन आणि अमित मिश्रा भारताची फिरकी गोलंदाजी सांभाळणार आहेत.
“माझे लक्ष्य गोलंदाजीच्या लाईन आणि लेन्थवर असेल, योग्य गोलंदाजी केल्यानेच यशस्वी होऊ शकतो. तेथील परिस्थितीनुसार गोलंदाजीत बदल करणे गरजेचे आहे. गोलंदाजीवर जास्तीत जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न करेन आणि सराव सामन्याचाही जास्तीत फायदा घेण्याचा माझा प्रयत्न राहील.” असेही भुवनेश्वर म्हणाला.