२००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना कोणताही भारतीय विसरु शकणार नाही. साखळी फेरीपासून ते उपांत्य फेरीपर्यंत स्वप्नवत प्रवास करणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती. भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली याच्या मनात ही सल कायम राहीलेली आहे. मात्र धोनी आपल्या संघात असता तर अंतिम सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागू शकला असता असं मत सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे.
“२००३ च्या विश्वचषक संघात धोनी अंतिम सामन्यात हवा होता. मला नुकतंच असं समजलं की ज्यावेळी आम्ही विश्वचषक खेळत होतो, त्यावेळी धोनी रेल्वेत टीसी म्हणून काम करत होता. माझ्यासाठी हे सर्व अवर्णनीय आहे.” नुकतचं प्रसिद्ध झालेल्या आपल्या आत्मचरित्रात (A Century is not Enough) सौरवने धोनीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २००३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १२५ धावांनी हरवलं, तर धोनीने २००४ साली आंतरराष्ट्रीय सामन्यात आपलं पदार्पण केलं होतं.
गेली कित्येक वर्ष खडतर परिस्थितीमध्ये शांत राहून खेळ करणारे खेळाडू मी पाहतो आहे. २००४ साली महेंद्रसिंह धोनीचा खेळ पाहिल्यानंतर, मला त्याच्या खेळातली चुणूक जाणवली होती. यानंतर धोनीने गेल्या काही वर्षात भारतीय संघासाठी जी काही कामगिरी केली ती पाहता धोनीबद्दल मी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला याचा मला आनंद असल्याचंही गांगुलीने आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. २००८ साली गांगुलीच्या निवृत्तीदरम्यान धोनीने शेवटच्या काही षटकांसाठी गांगुलीकडे संघाचं नेतृत्व सोपवतं आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला होता.
यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला २००७ च्या सुमारास भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. आपल्या पहिल्याच प्रयत्नात धोनीने भारताला टी-२० क्रिकेटचा पहिला विश्वचषक जिंकवून दिला होता. यानंतर धोनीच्याच कार्यकाळात भारताने कसोटी क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर २०११ साली विश्वचषक जिंकून इतिहासाची नोंद केली होती.