सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीची घडी विस्कटली आहे. लोकेश राहुलला शिखरच्या अनुपस्थितीत सलामीला बढती दिल्यामुळे विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. मात्र शंकरला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाहीये. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी चांगलीच कोलमडली. अशा परिस्थितीत ऋषभ पंत हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य पर्याय असल्याचं, माजी क्रिकेटपटू कृष्णमचारी श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर रोहितचं प्रश्नचिन्ह, ट्विट करुन व्यक्त केली नाराजी
“जर मी भारतीय संघ व्यवस्थापनाचा भाग असतो तर मी ऋषभ पंतसारख्या खेळाडूचा चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी विचार केला असता. शिखरच्या बदल्यात त्याची भारतीय संघात निवड झालेली आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो खेळण्यासाठी तयार झालेला आहे. याचसोबत इंग्लिश वातावरणात खेळण्याचा ऋषभकडे अनुभवही आहे.” आयसीसीसाठी लिहीलेल्या कॉलममध्ये श्रीकांत यांनी आपलं मत मांडलं आहे.
“मागच्या वर्षी कसोटी मालिकेदरम्यान ऋषभने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे सध्याच्या घडीला ऋषभला संघात जागा देणं योग्य राहिल. मधल्या फळीत विजय शंकर आणि केदार जाधव अजुनही फॉर्मात आलेले नाहीयेत. याचसोबत शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला चांगला खेळ करतो आहे, मात्र त्याने मैदानावर टिकून राहून खेळ करायला हवा.” श्रीकांत भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलत होते.
अवश्य वाचा – World Cup 2019 : मला संधी द्या, हार्दिकला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनवतो !