‘भारताची फुलराणी’ असे सायना नेहवालला गौरवाने म्हटले जाते. पण सायनाची घोडदौड सुरू असतानाच हैदराबादच्याच आणखी एका कन्येने गेल्या काही वर्षांमध्ये दिमाखदार कामगिरी करत बॅडमिंटनमध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. कनिष्ठ गटाचे आशियाई जेतेपद, गेल्या वर्षी श्रीनगर येथे राष्ट्रीय जेतेपदावर केलेला कब्जा, गतवर्षी चीन सुपर सीरिज स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ली झेरुईला हरवण्याची ऐतिहासिक कामगिरी आणि काही दिवसांपूर्वीच तिने कमावलेले मलेशियन ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धेचे जेतेपद, हे सिंधूच्या शिरपेचातील मानबिंदू. या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे सिंधूची सायनाशी तुलना होते. ‘सायनाने अतुलनीय यश मिळवले आहे, तिच्या खेळातून मी अनेक गोष्टी शिकते आहे. मात्र सायना होण्यापेक्षा सिंधू व्हायलाच आवडेल,’ असे सिंधू स्पष्टपणे सांगते. जागतिक क्रमवारीत अव्वल १५ स्थानांमध्ये असणाऱ्या १८ वर्षीय युवा बॅडमिंटनपटू सिंधूशी केलेली बातचीत-
मलेशियन ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धेचा अनुभव कसा होता?
या स्पर्धेतील प्रत्येक सामना आव्हानात्मक होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडू स्पर्धेत सहभागी होते. संपूर्ण स्पर्धा, जेतेपद यांचा विचार करण्याऐवजी प्रत्येक सामना आणि त्यानुसार योजना अमलात आणण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ केल्यामुळेच जेतेपद साकारता आले. मलेशियात भारतीय मोठय़ा संख्येने स्थायिक झाले आहेत. अंतिम फेरीत खेळताना मला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळाला. पहिल्यावहिल्या ग्रां. प्रि. जेतेपदाने आनंद झाला. मात्र ही खरी सुरुवात आहे. कामगिरीत आणखी सुधारणा करत सातत्यपूर्ण खेळ करण्याचा माझा यापुढेही प्रयत्न असेल. स्पर्धेदरम्यान स्मॅशच्या फटक्यांवर मी भर दिला. प्रतिस्पध्र्याना निरुत्तर करण्यासाठी ते उपयुक्त ठरले.
बॅडमिंटनमध्ये तंत्रज्ञानाचे आगमन होणार आहे, यामुळे खेळ तसेच डावपेचांत काही बदल होतील?
‘लाइन कॉल’ तंत्रज्ञान उपयुक्त होईल. लाइन कॉल अनेकदा वादग्रस्त मुद्दा ठरतो. पंच मुद्दामहून चुकीचा निर्णय देत नाहीत. तेही माणूसच आहेत, त्यांच्या हातून चूक होऊ शकते. अशा वेळी तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास ते खेळाडूंसाठी फायदेशीर ठरेल.
तुझ्या यशात गोपीचंद सर आणि पालकांचा मोठा वाटा आहे, त्यांच्या भूमिकेबाबत काय सांगशील?
गोपीचंद सरांनी माझ्या खेळातील सूक्ष्म बारकाव्यांवर मेहनत घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना खेळात सातत्याने सुधारणा करावी लागते. प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास करावा लागतो, त्यांचे कच्चे दुवे शोधावे लागतात. ही सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अंगी भिनवण्यासाठी गोपीचंद सरांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. बॅडमिंटन शारीरिकदृष्टय़ा दमवणारा खेळ आहे, मात्र त्याच वेळी मानसिक बैठक कणखर होणे आवश्यक आहे. यामध्येही सरांची भूमिका महत्त्वाची आहे. माझे आई-वडील दोघेही व्हॉलीबॉलपटू होते. आमचे घर गोपीचंद अकादमीपासून लांब होते. प्रवासात भरपूर वेळ जायचा. हे टाळण्यासाठी आम्ही अकादमीपासून पाच मिनिटांच्या अंतरावर घर घेतले आहे. माझी कारकीर्द घडावी, मला त्रास होऊ नये केवळ यासाठी आई-बाबांनी हा निर्णय घेतला. आतापर्यंतच्या वाटचालीत त्यांनी मला खंबीर आधार दिला आहे. जिंकल्यावर सगळेच साथीला असतात, मात्र अपयश आल्यानंतरही त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला आहे.
गेल्या वर्षी तू ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली झेरुईवर मात केलीस, तो अनुभव कसा होता?
माझ्या कारकीर्दीतला तो संस्मरणीय क्षण होता. ली झेरुईने ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावले आहे. चीनचे खेळाडू नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी करतात. प्रतिस्पध्र्याचा अचूक अभ्यास करून ते कोर्टवर उतरतात. कोणत्याही क्षणी गाफील राहण्याची चूक महागात पडू शकते. तिन्ही गेममध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करत हा सामना जिंकला, त्याचा आनंद औरच आहे. चीनच्या खेळाडूंनाही हरवता येते, हा आत्मविश्वास त्या सामन्यातून मला मिळाला.
‘भावी सायना नेहवाल’ असे तुझे वर्णन केले जाते, याचे कितपत दडपण जाणवते?
सायनाने देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत आणि निष्ठा आहे. चीनच्या खेळाडूंना टक्कर देत तिने सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्यामुळे तिचे यश अतुलनीय असेच आहे. तिच्या खेळातून मी नेहमीच प्रेरणा घेते. मात्र सायना नेहवाल बनण्यापेक्षा मला सिंधू व्हायला आवडेल. तिच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार प्रदर्शन करून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा माझा प्रयत्न असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा