भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघावरून (आयएबीएफ) अभयसिंह चौताला यांना पायउतार व्हावे लागणार आहे. ते भूषवत असलेले कार्याध्यक्षपदच रद्द करण्याची शिफारस आयएबीएफने केली असून, या घटना दुरुस्तीला परवानगी मिळविण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (एआयबीएफ) विनंती केली आहे.  
चौताला यांनी आयएबीएफचे अध्यक्षपद तीन वेळा भूषविले होते. त्यामुळे शासकीय नियमावलीनुसार त्यांना हे पद पुन्हा भूषविता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी कार्याध्यक्षपद निर्माण करीत त्यावर आपली निवड केली होती तर अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले मेहुणे अभिषेक मटोरिया यांना बिनविरोध निवडून आणले होते.याबाबत आयएबीएफच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, ‘‘घटना दुरुस्तीबाबत आम्ही आंतरराष्ट्रीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना लवकरच भेटणार आहोत. घटना दुरुस्तीला मान्यता मिळाल्यानंतर लगेचच आम्ही त्याची कार्यवाही करणार आहोत. सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुका या नियमावलीनुसार झाल्याचे आम्ही एआयबीएफला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’
आयएबीएफची विनंती मान्य झाली तर चौताला हे आपोआपच आयएबीएफवरून दूर होतील. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बंदी घातलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्षपद चौताला भूषवित आहेत.

Story img Loader