इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) स्पर्धेसाठीचा लिलाव काही दिवसांपूर्वीच झाला. लिलावादरम्यान काही आयकॉन खेळाडूंची मूळ किंमत कमी करण्याचा मुद्दा चांगलाच गाजला. याच मुद्यावर काही बॅडमिंटनपटूंनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाने धास्तावलेल्या आयबीएल व्यवस्थापनाने आता चक्क खेळाडूंना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे.
भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश दासगुप्ता आणि आयबीएलची व्यावहारिक सहयोगी संघटना स्पोर्टी सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चड्डा हे दोघे जण प्रसारमाध्यमांकरिता निवेदने प्रसिद्ध करतील. आयबीएलद्वारा करारबद्ध झालेले खेळाडू, पंच यांच्या करारात प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे.
लिलावादरम्यान ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या दुहेरी विशेषज्ञ आयकॉन खेळाडूंची मूळ किंमत ५०,००० अमेरिकन डॉलर्सवरून २५,००० अमेरिकन डॉलर्स अशी कमी करण्यात आली. या प्रकाराची ज्वाला आणि अश्विनीला कल्पना देण्यात आली नाही. या प्रकाराने भडकलेल्या ज्वाला आणि अश्विनीने आयबीएल व्यवस्थापनाच्या कामकाजावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले होते. यानंतर रुपेश कुमार आणि सनावे थॉमस या जोडीनेही मूळ किंमत कमी करण्याच्या मुद्यावरून आयबीएल व्यवस्थापनावर टीकेची झोड उठवली होती. या प्रकाराने नाराज झालेल्या या जोडीने स्पर्धेतून माघार घेण्याचा इशाराही दिला होता. या सर्व प्रतिक्रियांनंतर अडचणीत आलेल्या आयबीएल व्यवस्थापनाने आता खेळाडूंच्या बोलण्यावरच प्रतिबंध घालण्याचा अजब निर्णय घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा