ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ली चोंग वेई यांना आगामी इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सर्वाधिक भाव मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धेकरिता खेळाडूंचा लिलाव २२ जुलै रोजी होणार आहे.
सायना, चोंग वेई, ऑलिम्पिकपटू पी. कश्यप, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, पी.व्ही.सिंधू यांना प्रत्येकी ५० हजार डॉलर्स अशी मूळ किंमत देण्यात आली आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेल्या अव्वल ३० खेळाडूंमध्ये बुन्साक पोन्साना (थायलंड) व हुओ युआन (हाँगकाँग) यांनाही प्रत्येकी ५० हजार डॉलर्स ही पायाभूत किंमत मिळणार आहे.
सोनी द्वीकुंकारा (इंडोनेशिया), केनिची तागो (जपान) व तिएन मिन्ह निग्वेन (व्हिएतनाम)यांना किमान प्रत्येकी २५ हजार डॉलर्सचा भाव मिळणार आहे. १५ हजार डॉलर्सची किमान किंमत लाभलेल्या खेळाडूंमध्ये माजी ऑलिम्पिक व विश्वविजेता तौफिक हिदायत याचा समावेश आहे. भारताच्या आर.एम.व्ही.गुरुसाईदत्त याची किमान २५ हजार डॉलर्स किंमत असून अजय जयरामला ३० हजार डॉलर्सचा भाव ठेवण्यात आला आहे.
महिलांमध्ये ज्युलियन श्चेंक (जर्मनी), राचनोक इन्तानोन (थायलंड) यांची प्रत्येकी ५० हजार डॉलर्स ही पायाभूत किंमत ठरविण्यात आली आहे. पोर्नतीप बुरानाप्रेसत्सुक (२० हजार डॉलर्स), तिने बौन (३० हजार डॉलर्स), लिंडावेनी फानेत्री (१५ हजार डॉलर्स) आदी परदेशी खेळाडूंना या लिलावात आपले नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे. दुहेरीत खेळणाऱ्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनाही चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. चीनचे बाओ चुनलाई व झेंग बो या खेळाडूंचाही लिलाव होणार आहे. ही स्पर्धा १४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
सर्वोत्तम कामगिरीसाठी ली चोंग वेई उत्सुक
नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू ली चोंग वेई याने आगामी भारतीय बॅडमिंटन लीगमधील (आयबीएल) सहभाग निश्चित केला असून या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक झाला आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा रौप्यपदक मिळविणारा वेई याने आयबीएल स्पर्धेची संकल्पना अतिशय चांगली असल्याचे सांगितले.
सायना, चोंग वेई यांना ‘आयबीएल’च्या लिलावामध्ये सर्वाधिक भाव मिळणार?
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ली चोंग वेई यांना आगामी इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये..
First published on: 21-07-2013 at 07:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ibl shuttle ready to take off with sayna and chong star chinese on board