Ibrahim Zadran Creates History with 177 Runs Innings: पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असलेल्या अफगाणिस्ताने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात ३०० धावांचा टप्पा गाठला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य असल्याचे सिद्ध करत ७ विकेट गमावून ३२५ धावांचा डोंगर उभारला आहे. अफगाणिस्तानच्या या मोठ्या धावसंख्येचे श्रेय जाते, संघाचा युवा सलामीवीर इब्राहिम झादरान यांच्या ऐतिहासिक खेळीला. इब्राहिम झादरानने चॅम्पियन्स ट्रॉफीत मोठी कामगिरी करत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इब्राहिम झादरानने १४६ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १७७ धावांची वादळी खेळी केली. इब्राहिम झादरान हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. पण १७७ धावांच्या खेळीसह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतच इंग्लंडच्या बेन डकेटने १६५ धावा केल्या होत्या. आता त्याला मागे टाकत इब्राहिम झादरानने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

१७७- इब्राहिम झादरान वि. इंग्लंड, लाहोर (२०२५)
१६५ – बेन डकेट वि. ऑस्ट्रेलिया, लाहोर (२०२५)
१४५*- नॅथन ॲस्टल वि. यूएसए, द ओव्हल (२००४)

अफगाणिस्तानने ३७ धावांत ३ विकेट गमावल्यानंतर इब्राहिम झादरानने संघाचा डाव सावरला. एकापाठोपाठ एक तीन विकेट गेल्यानंतर सलामीवीर इब्राहिम झादरान दुसऱ्या टोकाला पाय घट्ट रोवून उभा होता. त्यानंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या साथीने संघाची धावसंख्या २५ षटकांत १०० धावांच्या पुढे नेली. यावेळी इब्राहिम झादरानने आपले अर्धशतक पूर्ण केले.

यानंतर २९व्या षटकात दोन्ही फलंदाजांना १०० धावांची भागीदारी पूर्ण करण्यात यश आले. पुढच्या षटकात कर्णधार शाहिदी ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला पण इब्राहिम झादरान मैदानातच होता. झादरानने पुढच्या ७ षटकांत आपली अप्रतिम कामगिरी सुरू ठेवली आणि इंग्लंडविरुद्ध १०६ चेंडूत स्फोटक शतक झळकावून नवा इतिहास रचला. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. यासह, तो एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला.

शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच अफगाणिस्तानच्या फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करत बेन डकेटचा विश्वविक्रम मोडला. इब्राहिम झादरान आणि मोहम्मद नबी यांनी २०० च्या स्ट्राईक रेटने ५१ चेंडूत १०० धावांची भागीदारी रचत संघाला ३०० धावांचा टप्पा करून दिला.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीसाठी ४पैकी २ संघ निश्चित झाले आहेत तर २ संघ बाहेर झाले आहेत. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचले आहेत, तर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशचा प्रवास गट टप्प्यातच संपला आहे. यानंतर आता ब गटातून कोणता संघ उपांत्य फेरीसाठी पोहोचणार यासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.