Ibrahim Zadran Gives Credit of Century to Afghanistan Player: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सेमीफायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना इंग्लंड वि. अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ३२५ धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येत संघाचा सलामीवीर फलंदाज इब्राहिम झादरान यांचे मोठे योगदान आहे. त्याने शानदार शतक झळकावत १७७ धावांची वादळी खेळी केली. या खेळीचे आणि शतकाचे श्रेय त्याने संघातील वरिष्ठ खेळाडूला दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इब्राहिमने १२ चौकार आणि ६ षटकारांसह १७७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. या शतकासह इब्राहिम झादरानने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. झादरान हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे. डाव संपल्यानंतर झादरानने आपल्या यशाचे रहस्य उलगडले आहे.

दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर असलेला इब्राहिम झादराने १७७ धावांची शानदार खेळी करत दणक्यात पुनरागमन केले. अफगाणिस्तानत्या डावानंतर तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं सोपं नाहीय, मी ७ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे, परंतु मी गेल्या १ वर्षापासून एकदिवसीय क्रिकेट खेळलो नव्हतो. माझ्याकडून अपेक्षा होत्या आणि मी चांगला खेळलो. मी स्वतःला दडपणाखाली ठेवले आणि मी या खेळीचा आनंद लुटला.”

झादरान पुढे म्हणाला, “मी माझा वेळ घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या बेसिक गोष्टींवर काम केलं, मला जास्त विचार करायचा नाही. पण मी शिस्तबद्ध पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो.”

इब्राहिम झादरानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचे मेंटॉर युनूस खान आणि मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दलही मोकळेपणाने सांगितले. झादरान म्हणाला, “युनूस खान त्यांचा अनुभव आमच्यासोबत शेअर करतात, ते पाकिस्तानमध्ये भरपूर क्रिकेट खेळले आहेत. पहिल्या सामन्यात मी धावा केल्या नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ते जोनाथन ट्रॉट यांच्यासोबत आहेत. ते मला म्हणाले की तू चांगला खेळत आहेस, तुला मोठी खेळी खेळण्याची गरज आहे. जेव्हा ४० धावांचा पल्ला गाठतोस. त्यानंतर तुला ६०-७० धावांपर्यंत जायचं आहे आणि त्यानंतर तुला मोठी खेळी खेळण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मी हाच विचार करून खेळण्यासाठी उतरलो.”

इब्राहिम झादरानने शानदार फलंदाजीचे श्रेय त्याने त्याचा सहकारी राशिद खानला दिले, याबद्दल बोलताना तो म्हणाला, “सामन्यापूर्वी मी राशिदशी बोललो आणि जेव्हाही मी त्याच्याशी बोलतो तेव्हा मी धावा करतो. मी शतक झळकावल्यावर रशीदचे आभार मानले.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ibrahim zadran gives credit of century and historic inning of 177 runs to rashid khan afg vs eng bdg