नवी दिल्ली : पाकिस्तानच्या विरोधानंतरही पुढील वर्षीची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अखेर संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच (हायब्रिड मॉडेल) आयोजित करण्याच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) एकमत झाले आहे. त्यामुळे भारताचे सामने दुबईत, तर अन्य सर्व सामने पाकिस्तानात खेळविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. मात्र, संमिश्र प्रारूपाचा नियम केवळ याच स्पर्धेपुरता मर्यादित नसून २०२७ सालापर्यंतच्या सर्वच स्पर्धांसाठी लागू करण्यात येणार आहे.
‘आयसीसी’चे नवे अध्यक्ष जय शहा आणि संचालक मंडळाच्या सदस्यांमध्ये दुबई येथील मुख्यालयात गुरुवारी बैठक पार पडली. यात पाकिस्तानचाही समावेश होता. या बैठकीत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याची माहिती ‘आयसीसी’मधील वरिष्ठ सूत्राकडून देण्यात आली.
‘‘पुढील वर्षीची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानमध्ये होणार असून भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळणार असल्याचे सर्व पक्षांनी तत्त्वत: मान्य केले आहे. सर्व भागधारकांचा या निर्णयाने फायदा होणार आहे,’’ असे सूत्राने सांगितले. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये नियोजित आहे.
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार घेण्यास पाकिस्तानने ठाम विरोध दर्शवला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांनी नमते घेताना संमिश्र प्रारूपास संमती दिली होती, पण त्यासाठी त्यांनी नवी अट ठेवली होती. २०३१ सालापर्यंच्या सर्वच स्पर्धांना हाच नियम लागू झाला पाहिजे. पाकिस्तानचा संघही ‘आयसीसी’च्या स्पर्धांसाठी भारतात जाणार नाही, अशी त्यांची अट होती. मात्र, ‘आयसीसी’ने केवळ २०२७ सालापर्यंतच्या स्पर्धांना हा नियम लागू केला आहे.
या काळात भारतामध्ये महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (२०२५) आणि पुरुषांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा (२०२६, श्रीलंकेबरोबर सह-यजमान) होणार आहे. या स्पर्धांत पाकिस्तानाचा संघ आपले संघ भारताबाहेर खेळण्याची शक्यता आहे.