केनिया, आर्यलड, स्कॉटलण्ड, अफगाणिस्तानचे खेळाडू दर्जेदार खेळाने चाहत्यांचे चाहत्यांची मने जिंकून घेतात. मात्र छोटय़ा देशांदरम्यान होणाऱ्या स्पर्धा आणि चार वर्षांनी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा वगळता हे लिंबूटिंबू उपेक्षितच राहतात. कसोटी हा क्रिकेटचा सगळ्यात मूलभूत प्रकार खेळण्याचे त्यांचे स्वप्न अपुरेच राहते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुढाकारामुळे लिंबूटिंबू देशांनाही आता मर्यादित प्रमाणावर कसोटी खेळण्याची संधी मिळणार आहे.
आयसीसीने आंतरखंड चषक २०१५-१७ स्पध्रेची घोषणा केली आहे. यामध्ये नामिबिया, हाँगकाँग, अफगाणिस्तान, आर्यलड़, नेदरलॅण्ड, पापुआ न्यू गिनी (पीएनजी), स्कॉटलण्ड आणि संयुक्त अरब अमिराती या संघांचा समावेश आहे. साखळी गटात अव्वल स्थान पटकावणाऱ्या संघाला कसोटी दर्जा असलेल्या संघापैकी तळाच्या संघाविरुद्ध २०१८मध्ये होणाऱ्या कसोटी चॅलेंज स्पध्रेत खेळण्याची संधी मिळणार आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, ‘‘आयसीसीच्या आंतरखंड चषक स्पर्धा ही उदयोन्मुख देशांसाठी चांगली संधी आहे. स्पध्रेच्या माध्यमातून या संघांना कसोटी खेळण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे या स्पध्रेत चुरस पाहायला मिळेल आणि क्रिकेटचा प्रसार होईल.’ २००४मध्ये पहिल्या आंतरखंड चषक स्पध्रेत स्कॉटलण्डने बाजी मारली होती, तर आर्यलडने (२००५, २००६-०७, २००७-०८ आणि २०११-१३) चारवेळा आणि अफगाणिस्तानने २००९-१०मध्ये जेतेपद पटकावले
होते.
संलग्न देशांना मिळणार कसोटी खेळण्याची संधी
केनिया, आर्यलड, स्कॉटलण्ड, अफगाणिस्तानचे खेळाडू दर्जेदार खेळाने चाहत्यांचे चाहत्यांची मने जिंकून घेतात.
First published on: 06-05-2015 at 02:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc allow tests match between kenya ireland scotland and afghanistan