ICC T20 World Cup 2024 10 Venues Announced: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी (२२ सप्टेंबर) २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. तारखा जाहीर करण्याबरोबरच, आयसीसीने स्पर्धेचे सामने कुठे खेळले जातील याची ठिकाणेही जाहीर केली आहेत. कॅरिबियन आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४ टी-२० विश्वचषक स्पर्धा ४ जूनपासून सुरू होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना २० जून रोजी होणार आहे.
या १० ठिकाणी खेळणार २० संघ –
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचे सामने एकूण १० ठिकाणी खेळवले जातील. यापैकी ७ स्थळे कॅरेबियन देशांना तर ३ ठिकाणे अमेरिकेला देण्यात आली आहेत. विश्वचषकाचे सामने अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डॉमिनिका, गयाना, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील फ्लोरिडा, डॅलस आणि न्यूयॉर्कलाही यजमानपद मिळाले आहे. यावेळी २० संघ टी-२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार –
स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा करताना, आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, आम्ही कॅरेबियन स्थळांची घोषणा करताना आनंदित आहोत, जे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन करतील आणि २० संघ या स्पर्धेत भाग घेतील, जे अद्याप झाले नाही. वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा आयसीसी पुरुषांच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.
हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम
हे संघ टी-२० विश्वचषकात दिसणार –
वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स याआधीच यजमान म्हणून २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त बांगलादेश, अफगाणिस्तान, आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांनी पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.