भारतीय क्रिकेटरसिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. २०१८ साली पहिल्याच महिन्यात १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान अंडर – १९ विश्वचषकाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा या विश्वचषकाचा मान न्यूझीलंडला मिळालेला आहे. न्यूझीलंडमधली एकूण ७ ठिकाणांवर हे सामने खेळवले जाणार आहेत.

स्पर्धेची सुरुवात माजी विजेते वेस्ट इंडिज विरुद्ध यजमान न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर याचदिवशी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना रंगणार आहे. कसोटी सामने खेळणाऱ्या सर्वोत्तम १० संघांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वीच कसोटी सामने खेळण्याची परवानगी मिळालेल्या अफगाणिस्तान आणि आयर्लंडलाही या स्पर्धेत थेट प्रवेश मिळालेला आहे. याव्यतिरीक्त नामिबीया, कॅनडा आणि पापुआ न्यू गिनी या संघांनाही विश्वचषकात प्रवेश मिळाला आहे.

साखळी सामन्यात भारतासमोरचं आव्हान हे तुलनेने सोपं आहे. ऑस्ट्रेलियाचा अपवाद वगळला तर भारताला इतर संघांकडून टक्कर मिळेल याची शक्यता कमीच आहे. या स्पर्धेत सहभागी संघांच्या गटवारी नेमकी कशी केली आहे, ते जाणून घ्या.

अ गट – वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, केनिया

ब गट – भारत, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी

क गट – बांगलादेश, इंग्लंड, नामिबीया, कॅनडा

ड गट – श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आयर्लंड

साखळी सामन्यांनंतर प्रत्येक गटातील पहिले २ संघ हे ‘सुपर लिग’ मध्ये पोहचतील. यावेळी उरलेले संघ हे प्लेट चॅम्पियनशिपसाठी खेळतील. त्यामुळे या आगामी स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader