Champions Trophy Team Of The Tournament: भारताने १२ वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने गेल्या ९ महिन्यात ही दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहितने अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळी खेळली आणि संघाच्या विजयाच्या पाया रचला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाचं सगळीकडे कौतुक सुरू असताना आयसीसीने मात्र वेगळाच निर्णय घेत सर्वांना चकित केलं.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ जाहीर केला पण चॅम्पियन कर्णधार रोहितला त्यात स्थान मिळाले नाही. दुबईत रविवारी ९ मार्चला झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्याच्या जोरावर टीम इंडियाने २५२ धावांचे लक्ष्य गाठले आणि सलग दुसरे विजेतेपद पटकावले.

रोहितला अंतिम सामन्यातील त्याच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. पण एका दिवसानंतर, जेव्हा आयसीसीने स्पर्धेतील सर्वाेत्कृष्ट संघ निवडला, तेव्हा रोहितला कर्णधार तर केलंच नाही पण १२ खेळाडूंमध्ये त्याचा समावेशही केला नाही. रोहितला सर्वाेत्कृष्ट संघात स्थान मिळाले नाही कारण अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधाराला स्पर्धेत फार धावा करता आल्या नाहीत.

संपूर्ण स्पर्धेत रोहितने ५ डावात केवळ १८० धावा केल्या. सलामीवीर म्हणून त्याची जागा संघात घेणं कठीण होतं. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा रचिन रवींद्र आणि अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झादरान यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीसीने मिचेल सॅन्टनरला या संघाचा कर्णधार बनवले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरने केवळ आपल्या संघाचे शानदार नेतृत्व केले नाही तर स्पर्धेत ९ विकेट्स घेतल्या आणि या शर्यतीत तो चौथ्या क्रमांकावर होता.

याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वाेत्कृष्ट संघात भारताचे ६ खेळाडू आहेत. टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे टॉप-मिडल ऑर्डर आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनाही स्थान मिळाले आहे. अक्षर पटेलची १२वा खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा सर्वाेत्कृष्ट संघ

मिचेल सँटनर (कर्णधार), रचिन रवींद्र, इब्राहिम झादरान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अजमतुल्ला ओमरझाई, मॅट हेन्री, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल (१२वा खेळाडू).

Story img Loader