आयसीसीने पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला १६ लाख डॉलर्स म्हणजेच ११.७२ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलर्स म्हणजेच ५.८५ कोटी मिळतील. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या आयपीएलमधील मानधन या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे.

आयपीएलमध्ये विराटला प्रत्येक हंगामात १७ कोटी रुपये मिळतात. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्प्टन येथे हा अंतिम सामना होणार आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन या दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या कर्णधारपदांमध्ये आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे दोघेही विजेतेपद मिळवून इतिहासात नाव नोंदवण्यासाठी आतूर असतील.

 

हेही वाचा – सुशांतचं क्रिकेट ‘कनेक्शन’, मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटरला दिलं होतं फलंदाजीचं प्रशिक्षण!

जर सामना ड्रॉ झाला, तर…

हा सामना ड्रॉ झाला, तर दोन्ही संघ संयुक्त विजेते असतील. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना विजेत्या आणि उपविजेत्यासाठी बक्षीस रकमेची अर्धी-अर्धी रक्कम मिळेल. इतकेच नाही तर विजेत्या संघाला आयसीसीकडून गदाही मिळेल. आयसीसीनेही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. पाच दिवसांत सामना झाल्यास या दिवसाचा उपयोग केला जाईल. यावर मॅच रेफरी निर्णय घेतील.

हेही वाचा – ‘सुपर’ जाफर..! नाना पाटेकरला सोबत घेत इंग्लंडच्या माजी कर्णधाराची केली बोलती बंद!

आयसीसीने २०१९मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात केली होती. एकूण ९ संघांना यात संधी देण्यात आली. सर्व संघांना प्रत्येकी ६ मालिका खेळाव्या लागल्या. पण करोनामुळे बर्‍याच मालिका पुढे ढकलल्या गेल्या. गुणतालिकेत टीम इंडिया प्रथम, तर न्यूझीलंडचा संघ दुसर्‍या क्रमांकावर होता. २०२३ ते २०३१ दरम्यान आयसीसी आणखी चार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धांचे आयोजन करेल.