नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानात खेळण्यास दिलेला नकार आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) पुकारलेला असहकार यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा संभ्रम वाढला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) चॅम्पियन्स करंडकाचे वेळापत्रक जाहीर करण्याचा आज, सोमवारी होणारा कार्यक्रम रद्द करणे भाग पडले आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत नियोजित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आयसीसी’कडून आज लाहोर येथे खास सोहळ्यात स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार होते. मात्र, सध्या निर्माण झालेल्या गोंधळामुळे ‘आयसीसी’ने हा कार्यक्रम केवळ पुढे ढकलला नाही, तर रद्द केला आहे. वेळापत्रकाबाबत यजमान आणि सहभागी देशांशी चर्चा सुरू असून, ही चर्चा पूर्ण झाल्यावर आम्ही आमच्यामार्फत कार्यक्रमाची घोषणा करू असे ‘आयसीसी’च्या एका अधिकाऱ्यानेच सांगितल्याचे कळते आहे.

‘बीसीसीआय’ने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात नव्याने चर्चेला सुरुवात झाली होती. स्पर्धा आयोजनासाठी गेल्या काही स्पर्धांचा मागोवा घेत संमिश्र प्रारूप (हायब्रिड मॉडेल) आराखड्यानुसार म्हणजे भारताचे सामने पाकिस्तानबाहेर आणि अन्य सामने पाकिस्तानात खेळविण्याचा विचार पुढे आला होता. मात्र, पाकिस्तानने यास नेहमीप्रमाणे विरोध केला असून, आता ‘बीसीसीआय’ने आमच्याकडे काहीच लेखी पाठवले नाही असे सांगून असहकाराची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>> ND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे

याचाही होणार विचार…

आता ‘आयसीसी’ सध्या पाकिस्तानातील लाहोर येथे वाढलेल्या विषारी धुक्याच्या संकटाची ढाल पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणामुळे लाहोरमधील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अन्य एका वृत्तानुसार पाकिस्तान अजून स्पर्धेच्या तयारीला लागलेच नसल्याचेही समोर येत आहे. पाकिस्तानातील निश्चित करण्यात आलेली केंद्र अद्याप पूर्णपणे अद्यायावत करण्यात आलेली नाहीत. या कामाला सुरुवातच झाली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे क्रिकेट वर्तुळात आता स्पर्धेचे आयोजनच अन्यत्र हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मानले जात आहे. अशा वेळी पाकिस्तानला यजमानपद टिकविण्यासाठी संमिश्र प्रारूप आराखडा स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, अशीही चर्चा आहे. ‘आयसीसी’कडून आज होणारा वेळापत्रक जाहीर करण्याचा कार्यक्रम रद्द करण्याची कृती या सगळ्या शंकेची पुष्टीच करते.

अमिराती आघाडीवर

वेळापत्रक निश्चित झालेही असेल, पण ते जाहीर करण्याची घाई ‘आयसीसी’ करण्यास तयार नाही. हा कार्यक्रम रद्द करताना अन्य देशांच्या मंडळांना किती विश्वासात घेण्यात आले हे देखील विचारात घ्यावे लागेल. एकूणच ‘आयसीसी’ आणि पाकिस्तान दोघांनाही ही स्पर्धा घेण्यासाठी संमिश्र प्रारूप आराखडा मान्य करावा लागेल, असे चित्र आहे. अशा वेळी भारताचे सर्व सामने घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला सर्वाधिक पसंती मिळत आहे. भारताचे सर्व सामने दुबई किंवा अबू धाबी येथे खेळविण्यात येतील. पाकिस्तानातील सामने रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे होतील असा पूर्वनियोजित कार्यक्रम सांगतो. मात्र, आता सगळा बदल ‘आयसीसी’ केव्हा जाहीर करते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule zws