वृत्तसंस्था, दुबई
तगडे प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांना दूर ठेवत अंतिम लढतीपर्यंतची वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स करंडक उंचवायचा झाल्यास आज, रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर भारताला फिरकीचा अडथळाही पार करावा लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अखेरची जिंकली होती. त्या संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे अनुभवी त्रिकूट अजूनही भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या तिघांचाही १२ वर्षांच्या कालावधीनंतर चॅम्पियन्स करंडक पुन्हा उंचावण्याचा मानस असेल.
‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने कायमच भारतासमोर आव्हान उभे केले आहे. अलीकडच्या काळात २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य लढत आणि २०२३च्या जागतिक अजिंक्यपद कसोटी (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम लढत यात न्यूझीलंडने भारतावर मात केली होती. ‘आयसीसी’ स्पर्धांच्या बाद फेरीत उभय संघांत आतापर्यंत चार सामने झाले असून यात तीन वेळा न्यूझीलंडने, तर केवळ एकदा भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदा चॅम्पियन्स करंडकाच्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला पराभूत केले असले, तरी अंतिम लढतीत ‘किवी’ संघाला कमी लेखण्याची चूक भारत निश्चितपणे करणार नाही.
चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाल्यापासूनच या स्पर्धेची बरीच चर्चा रंगते आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही. या स्पर्धेतील सर्व सामने दुबईत खेळण्याचा भारताला ‘गैर’फायदा मिळाल्याची टीका अनेक आजी-माजी खेळाडूंकडून करण्यात आली. मात्र, या टीकेकडे दुर्लक्ष करताना भारतीय संघाने मैदानावर चमकदार कामगिरी केली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकताना ‘आयसीसी’ जेतेपदाची दशकभराहूनही अधिक काळापासूनची प्रतीक्षा संपवली होती. आता आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत ‘आयसीसी’ची सलग दुसरी स्पर्धा जिंकण्याची भारताकडे संधी आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला सर्वोत्तम खेळ करावा लागणार याची भारतीय संघाला निश्चित कल्पना आहे.
दुबईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा दबदबा अपेक्षित आहे. भारताकडे रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती असे लयीत असलेले फिरकी गोलंदाज आहेत. त्याच वेळी न्यूझीलंडने चारपैकी तीन सामने पाकिस्तानात खेळल्याने त्यांच्या फिरकी गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही. मात्र, लाहोर येथील फलंदाजांसाठी नंदनवन ठरत असलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचा कर्णधार आणि डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने मधल्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. त्यामुळे न्यूझीलंडला उपांत्य लढत जिंकता आली. आता अंतिम लढतीतही भारतीय फलंदाजांना सँटनरपासून सावध राहावे लागेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी आता वापरण्यात येणार आहे. ही खेळपट्टी फिरकीला अनुकूल असणे अपेक्षित आहे. तसेच सामन्याच्या वेळी उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज आहे. त्यामुळे खेळाडूंची कसोटी लागेल.
केन विल्यम्सन : न्यूझीलंडच्या फलंदाजीची मदार सर्वांत अनुभवी अशा केन विल्यम्सनवर असेल. त्याने आतापर्यंतच्या चार सामन्यांत १८९ धावा केल्या आहेत. यामध्ये भारताविरुद्धच्या ८१ धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १०२ धावांच्या खेळीचा समावेश आहे. दुबईमध्ये भारताविरुद्धच्या साखळी लढतीत न्यूझीलंडला हार पत्करावी लागली होती. मात्र, विल्यम्सनने चांगला लढा दिला होता. तसेच भारताविरुद्ध त्याने याआधीही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याच्याकडे लक्ष असेल.
रोहित शर्मा : भारताचा कर्णधार रोहित शर्माला या स्पर्धेत मोठी खेळी करता आलेली नाही. मात्र, ‘रोहित किती धावा करतो यापेक्षा तो कसा प्रभाव पाडतो, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,’ असे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले आहे. रोहितमध्ये पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे गोलंदाजावर दडपण येते आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या फलंदाजाचे काम सोपे होते. त्यामुळे अंतिम लढतीतही रोहितची भूमिका निर्णायक ठरू शकेल. रोहितची ही अखेरची स्पर्धा असणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
रवींद्र जडेजा : अंतिम लढतीत रवींद्र जडेजा जडेजाची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. यंदाच्या स्पर्धेत जडेजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने सातत्याने बळी मिळवताना फलंदाजांना जखडून ठेवले आहे. त्याच्याविरुद्ध धावा करणे फलंदाजांना अवघड जात आहे. आता अंतिम लढतीतही डावखुरा जडेजा आपला अनुभव पणाला लावण्यास उत्सुक असेल. साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडवर मात केली होती. या विजयात वरुण चक्रवर्तीने पाच बळी मिळवण्याची किमया साधली होती. आताही वरुणच्या कामगिरीवर नजर असेल.
विराट कोहली : यंदाच्या स्पर्धेपूर्वी विराट कोहलीच्या कामगिरीबाबत बरीच चर्चा रंगली होती. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीला धावांसाठी झगडावे लागत होते. याचा त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, चॅम्पियन्स करंडकात कोहलीने आपले वेगळेपण पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम शतक साकारले. पाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने निर्णायक खेळी केली. मधल्या षटकांत कोहलीसह श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी योगदान देणे आवश्यक आहे.
रचिन रवींद्र : पाकिस्तानमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील दुखापतीनंतर रचिन रवींद्रला चॅम्पियन्स करंडकाच्या एका सामन्याला मुकावे लागले. मात्र, त्यानंतर दमदार पुनरागमन करताना त्याने तीन सामन्यांत दोन शतकांसह २२६ धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम लढतीत त्याचे योगदान महत्त्वाचे असेल. त्याने बांगलादेशविरुद्ध ११२ धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०८ धावांची खेळी केली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सध्या दुसऱ्या स्थानी आहे.
मिचेल सँटनर : दुबईच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर कर्णधार मिचेल सँटनरची भूमिका न्यूझीलंडसाठी निर्णायक ठरू शकेल. त्याने आतापर्यंत चार सामन्यांत सात गडी बाद केले आहेत. उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना रासी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बव्हुमा आणि हेन्रिक क्लासन या तारांकितांना माघारी धाडले होते. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय सुकर झाला. फलंदाजीत योगदान देण्याचीही सँटनरमध्ये क्षमता आहे. त्याला मायकल ब्रेसवेल, रचिन आणि ग्लेन फिलिप्सच्या फिरकीची साथ लाभेल.
भारताचा प्रवास
●बांगलादेशवर सहा गडी राखून विजय
●पाकिस्तानवर सहा गडी राखून मात
●न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय
●ऑस्ट्रेलियावर चार गडी राखून विजय (उपांत्य सामना)
‘आयसीसी’ स्पर्धांत : ●एकूण सामने : १२ ●भारत विजय : ६ ●न्यूझीलंड विजय : ६
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमनेसामने : ●एकूण सामने : ११९ ●भारत विजय : ६१ ●न्यूझीलंड विजय : ५० ●बरोबरी : १ ●रद्द : ७
न्यूझीलंडची वाटचाल
●पाकिस्तानवर ६० धावांनी विजय
●बांगलादेशवर ५ गडी राखून विजय
●भारताकडून ४४ धावांनी पराभूत
●दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी विजय (उपांत्य सामना)
संघ
●भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत.
●न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, विल यंग, केन विल्यम्सन, रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेन्री, विल ओरूर्क, नेथन स्मिथ, मार्क चॅपमन, जेकब डफी.
●वेळ : दुपारी २.३० वा.
●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.