दुबई : चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या कच्च्या दुव्यांचा फायदा घेण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगताना न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज विल यंगने साखळी फेरीतील पराभवाने आम्ही बरेच काही शिकलो, असे स्पष्ट केले.
‘‘साखळीतील भारताविरुद्धच्या पराभवाने आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले. विशेष करून आम्हाला भारतीय संघ एकाच ठिकाणी राहिल्यावर त्याचा कसा फायदा घेऊ शकतो हे तपासून पाहण्याची उत्तम संधी मिळाली,’’ असे यंग म्हणाला.
‘‘गेल्या काही वर्षात भारत आणि न्यूझीलंड दोघांनी खूप चांगले क्रिकेट खेळले आहे. अर्थात हा खेळ आहे. सामन्याच्या दिवशी जो चांगला खेळ करणार तोच जिंकतो. भूतकाळात काय घडले यात अडकून पडण्यापेक्षा सामन्यात कसा खेळ करायचा हा विचार महत्त्वाचा आहे,’’ असे यंगने नमूद केले.
अंतिम सामन्यात खेळताना समोर येईल त्या आव्हानाचा सामना करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. आव्हानात्मक परिस्थितीत खेळ उंचावण्याची क्षमता आमच्याकडे पुरेशी असल्याचेही यंगने सांगितले.
न्यूझीलंडने २००० मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळविले, तेव्हा यंग आठ वर्षांचा होता. आज २५ वर्षांनी तो त्याच स्पर्धेची अंतिम लढत खेळत आहे. यंग म्हणाला, ‘‘त्या संघात प्रतिष्ठित खेळाडू होते आणि या संघातील खेळाडू आता प्रतिष्ठित होण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा न्यूझीलंडला जिंकताना पाहणे खूप छान होते आणि न्यूझीलंडसाठी खेळताना तोच अनुभव प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी उत्सुक आहे.’’