वृत्तसंस्था, दुबई

चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा आमचा दृढनिश्चय पक्का आहे. न्यूझीलंडविरुद्ध यशस्वी कामगिरी करण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने अंतिम लढतीच्या पूर्वसंध्येला सांगितले.

अंतिम सामना खेळताना दडपण जाणवणार हे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गिलने मान्य केले. ‘‘मोठ्या स्पर्धेत प्रत्येक संघ विजेतेपदाच्या दृढनिश्चयाने उतरत असतो. आम्हीही याला अपवाद नाही. अंतिम सामन्याचे दडपण मोठे असते. ही परिस्थितीत जो संघ यशस्वी हाताळेल तो संघ जिंकेल,’’ असे गिल म्हणाला.

‘‘एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत खेळण्याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही ती लढत जिंकू शकलो नव्हतो. मात्र, यावेळी आम्ही त्या चुका पुन्हा करणार नाही याची खात्री आहे,’’ असे गिलने नमूद केले.

‘‘रोहित आणि विराट यांच्यामुळे भारतीय फलंदाजीला वेगळी ताकद मिळाली आहे. भारतीय संघाची फलंदाजी खोलवर आहे. त्यामुळे आघाडीच्या फळीतील फलंदाजांना अधिक मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य मिळते,’’ असेही गिलने सांगितले.

रोहित, विराटच्या निवृत्तीची चर्चा नाही

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापैकी एकजण निवृत्ती घेऊ शकतो अशी चर्चा फक्त मैदानाबाहेर आहे. ड्रेसिंग रूममध्ये अशा प्रकारची कुठलीच चर्चा नाही. प्रत्येक खेळाडू हा फक्त आणि फक्त अंतिम सामन्याचा विचार करत आहे, असे गिलने स्पष्ट केले.