एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेहमीच नशिबाने दगा दिल्याने ‘कमनशिबी’ हा दक्षिण आफ्रिका संघावर बसलेला शिक्का साखळीमधील अखेरच्या सामन्यात नशिबाने पुसला गेला. त्यामुळेच आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेची त्यांना उपांत्य फेरी गाठता आली. बुधवारी दक्षिण आफ्रिकेची गाठ पडत आहे ती यजमान इंग्लंडशी. आता विजेतेपद दोन पावलांवर येऊन उभे राहिल्याने स्पध्रेतील उत्कंठा आणि चुरस वाढली आहे.
‘अ’ गटात अव्वल ठरलेला इंग्लिश संघ ‘ब’ गटातील उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेशी लढणार आहे, तर गुरुवारी कार्डिफ येथे ‘ब’ गटातील विजेता भारत ‘अ’ गटातील उपविजेत्या श्रीलंकेशी लढणार आहे. सोमवारी रात्री द ओव्हल मैदानावर एका चित्तथरारक लढतीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला २० धावांनी हरवून घरचा रस्ता दाखवला.
कार्डिफला झालेला ‘ब’ गटातील अखेरचा साखळी सामना पावसाने झोडपला. डकवर्थ-लुइस नियमानुसार हा सामना शेवटी ‘टाय’ झाला. परंतु सरस धावगतीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. अनेक महत्त्वाच्या स्पध्रेतील सामने गमावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर कमनशिबी असा शिक्का बसला होता. त्यांनी फक्त १९९८मध्ये आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकला होता. पण त्या वेळी तो ‘आयसीसी नॉक-आऊट करंडक’ म्हणून ओळखला जायचा. त्या यशानंतर अनेक महत्त्वाच्या स्पर्धामध्ये दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीच्या पलीकडे मजल मारता आली नव्हती. पण ए बी डी’व्हिलियर्सच्या नेतृत्वाखाली हा संघ हा इतिहाससुद्धा बदलण्यासाठी आतुर आहे.
दक्षिण आफ्रिकेची साखळी फेरीमधील कामगिरी संमिश्र स्वरूपाची झाली. भारताविरुद्धचा पहिलाच सामना त्यांनी गमावला, मग पाकिस्तानला त्यांनी हरवले, तर वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना ‘टाय’ झाला. दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांत खेळू न शकलेला वेगवान गोलंदाज डेल स्टेन संघात परतला आहे, ही आफ्रिकेसाठी सुखद गोष्ट आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याने ३३ धावांत २ बळी घेतले होते. स्टेनशिवाय दक्षिण आफ्रिकेकडे मध्यमगती गोलंदाज रयान मॅकलारेन, ख्रिस मॉरिस, लानवाम्बो त्सोत्सोबे आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रॉबिन पीटरसन असा दर्जेदार गोलंदाजीचा मारा आहे. पाकिस्तानविरुद्ध मॅकलारेन याने चार बळी घेतले होते.
फलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेची प्रमुख मदार असेल ती हशिम अमलावर. कॉलिन इनग्रामने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ८३ चेंडूंत ७३ धावा केल्या होत्या. याशिवाय डी’व्हिलियर्स, फॅफ डय़ू प्लेसिस, जे पी डय़ुमिनी आणि डेव्हिड मिलर हे सामन्याचा निकाल बदलण्यात वाकबदार आहेत.
दुसरीकडे इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात १० धावांनी विजय मिळवून आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. घरच्या प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेपेक्षा इंग्लंडचा संघ सहज वरचढ ठरेल, हे स्पष्ट आहे.
इंग्लंडच्या आघाडीच्या फळीची धुरा असेल ती कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, इयान बेल, जोनाथन ट्रॉट, युवा जो रूट आणि रवी बोपारा यांच्यावर. त्यामुळे आपल्याला अनुकूल खेळपट्टय़ांवर ते सहज मोठी धावसंख्या उभारू शकतात.
इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स करंडकाचा संभाव्य विजेता मानला जातो. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी उभारलेले ७ बाद २९३ धावांचे आव्हान पेलताना नंतर त्यांचे गोलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यांत गोलंदाजी ही इंग्लिश संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे. कागदावर पाहिल्यास पाकिस्ताननंतर इंग्लंडच्या गोलंदाजीचा दुसरा क्रमांक लागतो. स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन आणि टिम ब्रेसनन या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटावर इंग्लिश गोलंदाजांची धुरा आहे.

प्रतिस्पर्धी संघ
दक्षिण आफ्रिका : ए बी डी’व्हिलियर्स (कर्णधार), हशिम अमला, फरहान बेहरदीन, जीन-पॉल डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, कॉलिन इनग्राम, रयान मॅकलारेन, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, अल्विरो पीटरसेन, रॉबिन पीटरसन, आरोन फांगिसो, डेल स्टेन, रॉरी क्लीनवेल्ट, लोनवाबो त्सोत्सोबे.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीव्हन फिन, जो रूट, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन, इयान बेल, टिम ब्रेसनन, जोस बटलर, ईऑन मॉर्गन, ग्रॅमी स्वान, जोनाथन ट्रॉट.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : ‘स्टार क्रिकेट’ आणि ‘स्टार  स्पोर्ट्स-२’.