दैव बलवत्तर असेल तर कोणतीही गोष्ट आपल्यापासून कुणीही दुरावू शकत नाही, हेच नेमके इंग्लंडच्या बाबतीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात घडताना पाहायला मिळाले. धावांचा डोंगर उभारूनही सामना गमावण्याचे चित्र इंग्लंडपुढे रेखाटले जाऊ लागले होते, कारण केन विल्यमसन इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत सुटला होता. होत्याचे नव्हते करत न्यूझीलंडला विजयासमीप तो घेऊन जात होता, पण स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ‘नो बॉल’वर विल्यमसनचा झेल अ‍ॅन्डरसनने पकडला आणि सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. पंचांनी बाद दिल्यावर विल्यमसन तंबूत परतत असताना मैदानातील ‘स्क्रीन’वर नोबॉल असल्याचे दिसत होते, पण इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने खेळभावना दाखवत विल्यमसनला पुन्हा बोलवले नाही आणि न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्लुमही मूग गिळून गप्प बसला. विल्यमसनला अखेर तंबूत परतावे लागले आणि इंग्लंडने १९ धावांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अ‍ॅलिस्टर कुकच्या ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडपुढे २४ षटकांत १७० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची ५ बाद ६२ अशी अवस्था होती, पण त्यानंतर विल्यमसनने तडाखेबंद फलंदाजी करत इंग्लंडच्या मुखातून विजयाचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला. त्याने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारत इंग्लंडच्या नाकीनऊ आणले होते. पण दुर्दैवीरीत्या तो बाद झाला आणि न्यूझीलंडला सामना गमवावा लागला.

Story img Loader