ICC Champions Trophy 2025 India Matches: यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियाच्या दमदार कामगिरीची चर्चा आहे. पण त्याचवेळी या कामगिरीसाठी टीम इंडियाच्या पथ्यावर पडणारं स्पर्धेचं वेळापत्रक कारणीभूत असल्याचा दावा अनेक सहभागी संघांच्या आजी-माजी खेळाडूंकडून केला जात आहे. यात पाकिस्तान, द. आफ्रिका, इंग्लंड या संघांच्या खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणं भारतीय संघासाठी खरंच फायदेशीर ठरलं का? इतर संघांवर हे वेळापत्रक खरंच लादलं गेलं का? अशा मुद्द्यांवरून नेटिझन्स सोशल मीडियावर भिडल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमका काय आहे वाद?
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे गेलं. मात्र, आधीच ठरलेल्या धोरणानुसार भारतानं पाकिस्तानमध्ये स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास नकार दिला. शेवटी भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भारताशी ज्या संघांचे सामने होतील किंवा होऊ शकतील त्या सर्व संघांना पाकिस्तान ते दुबई आणि मग पुन्हा पाकिस्तान असा वारंवार प्रवास करावा लागला. भारत अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे पाकिस्तान यजमान देश असूनही अंतिम सामना देशाबाहेर दुबईत खेळवण्याची वेळ पाकिस्तानवर आली.
दुबई न सोडण्याची बाब टीम इंडियाच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जात असून दुसरीकडे इतर संघांवर वारंवार करावा लागणारा प्रवास आणि त्याअनुषंगाने वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वेळ ही बाब इतर संघांसाठी त्रासदायक ठरल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून आता नेटिझन्समध्ये तुफान चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अयान पाँट यानं “आयसीसीचं आणि भविष्यातील कोणत्याही जागतिक स्पर्धेचं महत्त्व कायम राखायचं असेल, तर आता कोणत्याही एका देशाच्या अनुषंगाने आयसीसीच्या स्पर्धांची व्यवस्था बदलता कामा नये. ही बाब चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसतेय. एकतर तुम्ही न्याय्य नियमांनी खेळा किंवा खेळूच नका”, अशी पोस्ट केली आहे.
यावर एका युजरनं “स्पर्धेचं वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या खूप आधीच जाहीर झालं होतं, तेव्हा कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डानं त्यावर आक्षेप घेतला नाही. मग आत्ताच का रडारड करतायत? वेळापत्रक जाहीर झालं तेव्हाच बोलायला हवं होतं”, असा मुद्दा मांडला आहे.
“…त्या बैठकीत सर्व होते”
दरम्यान, एका युजरनं स्पर्धेआधी वेळापत्रक ठरवण्याच्या आयसीसीच्या बैठकीला सर्व सदस्य देशाच्या क्रिकेट बोर्डाचे सदस्य उपस्थित होते, सगळ्यांनी या वेळापत्रकाला सहमती दर्शवली होती, त्यामुळे आधी तुमच्या देशांमधल्या क्रिकेट बोर्डांना प्रश्न विचारा, अशी पोस्ट केली आहे.
“भारतानं अधिकाधिक सामने खेळावेत यासाठीच…”
एका युजरनं टीम इंडियानं अधिकाधिक सामने खेळावेत यासाठीच आयसीसीनं २०१५ नंतर भारताला सर्व स्पर्धांमध्ये कमकुवत गटात ठेवल्याचा दावा केला आहे. “२०२४ मध्ये टी २० सेमीफायनल गयानात ठेवण्यात आली. सर्व सामने भारताच्या वेळापत्रकानुसार ठरवले. भारताचे ८० टक्के सामने शनिवार-रविवारी आयोजित होतात. यंदाही चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत आयोजित केले गेले”, असा दावा केला आहे.
एकीकडे अंतिम सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील संभाव्य विजेत्याबाबत अंदाज बांधले जात असताना दुसरीकडे टीम इंडियाच विजयी व्हावी या दृष्टीने नियोजन केल्याचे दावे केले जात आहेत आणि सोशल मीडियावर यावरून तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.